पुणे :
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये दोन दिवसीय सहकार संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना सहकार मंत्री म्हणाले की केंद्रातील नरेंद्र मोदीजींचे सरकार सहकार क्षेत्रातल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आज देशात सहकार क्षेत्रामध्ये काही ठराविक राज्यं चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात सहकार अतिशय जुना आहे कारण सहकार हा महाराष्ट्राचा स्थायीभाव राहिलेला आहे आणि संपूर्ण देशात सहकाराचा प्रसार करण्यामध्ये या राज्याने खूप मोठं योगदान दिलं आहे असं त्यांनी सांगितलं.
सहकार क्षेत्रातल्या सर्व प्रश्नांवर लक्ष केंद्रित करता यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका स्वतंत्र्य सहकार मंत्रालयाची स्थापना केली, असं ते म्हणाले. सहकारी पतसंस्थांचे एक अतिशय मोठे जाळे आपल्या देशात आहे आणि या जाळ्याने देशातल्या तळागाळातल्या घटकांना आर्थिक विकासासाठी बळ दिले आहे, असे त्यांनी अधोरेखित केलं. येणाऱ्या दशकात सहकार क्षेत्र सर्वात जास्त प्रासंगिक क्षेत्र असेल असं त्यांनी नमूद केलं.