विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवार यांची निवड.

0

मुंबई :

राष्ट्रवादी कॉंग्रसेच वरिष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली आहे.

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, असे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले. त्यांनतर विधानसभेच्या अध्यक्षांनी अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे घोषित केले.

शिवसेनेमध्ये फुट पडल्यामुळे विधीमंडळात आता विरोधी बाकांवर राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले. राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी आमदारांची बैठक रविवारी बौलावण्यात आली होती. त्यावेळी आमदारांनी अजित पवार यांच्या नावाला पसंती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले. “ विरोधी पक्षनेता हा जनतेची न्याय्य बाजू मांडणारा नेता असतो. तो सत्तारुपी हत्तीवर अंकूश ठेवणारा असतो. अजित पवार यांना सभागृहातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षालाही काम करणे सोपे जाईल,“ असे मुख्यमंत्री म्हणाले.

“अजित पवार पूर्वी उपमुख्यमंत्री होते आणि मी विरोधी पक्षनेता होतो. आता आमच्या पदांची अदलाबदल झाली आहे. अजित पवार विरोधी पक्षनेते झाले असले तरी त्यांच्या मनात ज्या पदावर जायचे आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो,“ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवार यांनी आपण विरोधासाठी विरोध करणार नाही, तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडू अशा भावना व्यक्त केल्या. “महाराष्ट्राच्या विधानसभेला उज्ज्वल परंपरा आहे. त्यात विरोधीपक्ष नेत्याचीही परंपरा आहे. आमचा ग्रुप १९९०च्या बॅचचा होता. त्यापूर्वी १९८५ मध्ये बाळासाहेब थोरातांचा ग्रुप निवडून आला होता. पूर्ण बहुमत मिळून भाजप-शिंदे गट सत्तेत आले आहेत. लोकशाहीत ज्याप्रमाणे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपद महत्वाचे असते, त्याप्रमाणेच विरोधीपक्ष नेतेपदही महत्वाचे असते. आपण आजवर अनेक नेत्यांना हे पद भूषवताना पाहिले आहे,“ असे सांगत अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

See also  अकरा टर्म आमदार भूषविलेले शेकाप नेते गणपतराव देशमुख यांचे निधन