प्रस्तावित पुणे महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने संजय काकडे पुन्हा एकदा सक्रिय : भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड

0

पुणे :

माजी खासदार संजय काकडे यांच्यावर भाजपने प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याबाबतचे नियुक्तिपत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना दिले. माजी खासदार काकडे यांनी याबाबत फेसबुक पोस्ट करून माहिती दिली. मागचा काही काळ राजकीय घडामोडींपासून दूर राहणारे काकडे आता प्रस्तावित पुणे महापालिका निवडणुकांच्या यानिमित्ताने पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यातील गत महापालिका निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता आणण्यात काकडे यांचा महत्त्वाचा वाटा होता. तथापि, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ते राजकीय घडामोडींपासून काही काळ दूर होते. एवढेच नव्हे, तर संजय काकडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घेतल्याची आवईसुद्धा उठवण्यात आली होती. गुंड गजा मारणे याच्याशी संबंध जोडून त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती, परंतु न्यायालयाने तातडीने त्यांची सुटका केली.

आपल्या नियुक्तीचे पत्र समाज माध्यमावर प्रसिद्ध करतानाच संजय काकडे यांनी पक्षवाढीसाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी उद्या (दि. 7) पत्रकार परिषदही बोलावली आहे.

आपल्या निवडीबद्दल संजय काकडे यांनी फेसबुकवर भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याचा मला आनंद आहे. पक्षाचे सर्वोच्च नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

आजवर प्रत्येकवेळी मी पक्षाच्या भल्यासाठी काम करत आलो. पक्षाने जी जबाबदारी मला दिली ती इमानदारीने पार पाडली. देशात, राज्यात व पुणे शहरात भाजपा क्रमांक एकचा पक्ष आहे. आणि यापुढील काळात पक्षाच्या हितासाठी आणि पुणे शहर व पश्चिम महाराष्ट्रात भाजपा क्रमांक एकवर राहण्यासाठी मी जीवाचं रान करणार आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब आणि थेंब उपयोगी पडेल, हा शब्द मी यानिमित्ताने देतो.

See also  पीएमपीएमएलच्या बसमधून प्रवास करण्यासाठी आता कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस बंधनकारक