पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

0

पुणे :

आरोग्य सुविधा आणि पीपीपी तत्वावर विकास कामे करणारे पुणे महापालिकेचे २०२१-२२ या वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी मुख्य सभेत सोमवारी सादर केले. सुमारे ८३७० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आसून मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार कोटी रुपये जास्तीचे सादर करण्यात आले आहे. यामध्ये महसूलात प्रभावी वाढ करण्यात आली आहे. मागील १० वर्षांचा अंदाजपत्रकाचा आढावा घेतला तर अपेक्षित उत्पन्न आणि प्रत्यक्षातील उत्पन्न यात मोठी तफावत दिसते आहे. अंदाजपत्रकात अपेक्षित उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना आणि अंमलबजावणी यावर विशेष भर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मगील वर्षी महसूल वाढीसाठी स्वतंत्र स्थापन केलेला कक्षा यावर्षी कार्यान्वित करण्यात येणार आहे.

महसूलवाढीसाठी खालील उपाययोजना करण्यात येणार आहेत :

मिळकत कर आकारणाती गळती थांबविणार आहेत. अभ्यासपूर्ण योजना आखून मिळकतकरातील थकबाकी वसूल करण्याची अंमलबजावणी करण्यात येतील. शहरातील आणि समाविष्ट ३४ गावांतील ६ मीटर रस्त्यांवर स्थायी समितीच्या अखत्यारित २१० आखणी करून ते रस्ते रुंद करून पुनर्विकासाला चालना देऊन निधी उभा करणार. मालमत्ता व्यवस्थापन विभागाअंतर्गत ठाणे महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेत धोरण आणून त्या अनुषंगाने उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार. शहरात किमान २०० ठिकाणी पादचारी उन्नत मार्ग विकसित करून आकाशचिन्ह विभागाच्या माध्यमातून जाहिरातीचे हक्क देऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार. शहरातील महापालिकेची उद्याने, उड्डाण पूल, नदीवरील पुलांवर जाहिरातीचे हक्क देऊन उत्पन्न वाढीचा प्रयत्न करणार. मोबाइल कंपन्यांच्या थकबाकीसाठी निश्चित धोरण आखून प्रभावी वसुली करणार. महसूल संदर्भातील न्यायप्रविष्ट दाव्यांवर लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांची लवाद म्हणून नियुक्ती करून दावे लवकरात लवकर निकाली काढून थकीत महसूलची प्रभावी वसुली करणार. महसूल वसुलीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधा उपलब्ध करून देणार. विकासाला पर्यायाने महसूल वाढीला चालना देण्यासाठी विविध भागांतील रस्ते आणि वास्तूंचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या (पीपीपी) माध्यमातून पुनर्विकास करणार. अॅमिनिटी स्पेसबाबत निश्चित धोरण आखून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करणार. महापालिकेचे महत्त्वाकांक्षी, मोठे, दीर्घ मुदतीचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची उभारणी करणार. शहरात उद्योग-व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी यासाठी निश्चित धोरण आखून अंमलबजावणी करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी म्हटले आहे.

See also  अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी पीएमपी ची बस सेवा सुरू

शिवणे-खराडी रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, बालभारती-पौड फाटा रस्ता या महत्त्वाच्या रस्त्यांसाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच या योजनांमध्ये काही विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यापैकी डिसेंबर अखेरपर्यंत पाच टप्प्यांवर मेट्रो धावणार आहे. स्वारगेट-कात्रज, नगर रस्ता बीआरटी कार्यान्वित करण्यात येईल. एचसीएमटीआरला गती देणार, राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत नगर रस्त्यावर उड्डाण पूल, डी. पी. रस्ते आणि पूल खासगी सहभागातून (पीपीपी) विकसित करणार, पादचाऱ्यांसाठी सिग्नल अशी विकासकामे करण्यात येणार आहेत.

समान पाणीपुरवठा योजनेला गती

पुणे शहराची भविष्याची पाण्याची गरज लक्षात घेऊन पुणेकरांना शुद्ध, पुरेसा आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा करता यावा, या उद्देशाने समान पाणीपुरवठा योजना या महत्त्वाकांक्षी योजनेचे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत शहरात ८२ साठवण टाक्या बांधणे, १८०० किलोमीटरची जलवाहिनी टाकणे आणि ३ लाख १५ हजार जलमापक (मीटर) बसविणे आदी विकासकामांचा समावेश आहे. मार्च २०२१ पर्यंत ५० टाक्यांची उभारणी, ३०० कि. मी. लांबीच्या जलवाहिन्या टाकणे आणि ४० हजार मीटर बसविण्याची कामे पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

आरोग्य विभागासाठी तरतूद

यो योजनेत वैद्यकीय महाविद्यालयासाठी १४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रक्तपेढी उभारणे, नवीन कार्डीअॅक रुग्णवाहिका घेणे, अपघात विमा योजना यासाठी तरतूद करण्यात आली आहे.