पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवनातील जलसाठ्यात 3.94 टक्क्यांची वाढ

0

पवना :

पुणे शहर परिसरामध्ये दोन दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहर परिसरातील धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहेत. पिंपरी चिंचवडकरांना आणि मावळातील हजारो शेतकऱ्यांची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत असून ही आनंदाची बातमी नागरिकांसाठी आहे.

पवना धरण परिसरात काल(शनिवारी) पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे एका दिवसांत पाणी पातळीमध्ये 3.94 इतकी वाढ झाली आहे. आज (रविवारी) सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा 28.77 टक्के इतका झाला आहे. पवना धरण परिसरात काल दिवसभरात 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पावसाळा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 662 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सध्या धरणात 28.77 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत 655 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यावेळी धरणातील पाण्याची पातळी 30.75 टक्के इतकी होती. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पवना धरणात 17.43 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामध्ये आत्तापर्यंत 11.34 टक्के इतका पाणीसाठा वाढला आहे. मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आता मान्सून चांगलाच सक्रीय झाला आहे.

आज(रविवारी) जिल्ह्यात पावसाचा अंदाज असून, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा या भागात 100 मिलिमीटरच्या वरती पावसाची नोंद झाली आहे. तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात 200 मिलिमीटरच्या वरती पावसाची नोंद झाली आहे.

भोर तालुक्यातील शिरगावमध्ये 121 मिलिमीटर, हिरडोशी 120 मिलिमीटर, भूतोंडे 166 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. वेल्हा तालुक्यात वेल्हा 128 मिलिमीटर, गिसर 135 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. मावळ तालूक्यातील उजनी खंडाळा 235 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
भीमाशंकर चासकमान भागात ही 208 मिलिमीटर पाऊस बरसला आहे.

See also  ACP कडुन पत्नी अन पुतण्याची हत्या; नंतर स्वतःलाही संपवले

मुसळदार पाऊस आणि हिरवा निसर्ग पाहण्यासाठी आणि वर्षाविहारासाठी लोणावळ्यात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. शहर परिसरात असलेले धबधबे आणि लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. विक एंडला या भागामध्ये मोठ्या पर्यटक येत असतात. मुसळधार पाऊस असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.