पीव्ही सिंधूने कारकिर्दीत पहिल्यांदाच सिंगापूर ओपन २०२२ चे पटकावले विजेतेपद..

0

मुंबई :

सिंगापूर ओपन २०२२ स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूने विजेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे. स्पर्धेतील बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चिनी संघाची खेळाडू झी ई वांग हिचा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.

पीव्ही सिंधूने तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच सिंगापूर ओपन २०२२ चे विजेतेपद पटकावले आहे. सिंधूने चीनच्या वांगचा २१-०९, ११-२१, २१-१५ असा पराभव करत हा विजय मिळवला. सिंगापूर ओपन ही मानाची स्पर्धा जिंकणारी सिंधू दुसरी भारतीय महिला आणि एकूण तिसरी भारतीय ठरली आहे. या आधी सायना नेहवालने २०१० मध्ये ही स्पर्धा जिंकली होती आणि पुरुष बॅडमिंटनमध्ये भारताच्या बी. साई प्रणितने २०१७ मध्ये ही स्पर्धा जिंकण्यात यश मिळवले होते.

सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये भारताच्या पी व्ही सिंधूने आक्रमक खेळ दाखवत चीनच्या वांग हिला वर्चस्व मिळवू दिले नाही. त्यामुळे पहिल्या सेटमध्ये सिंधूने २१-०९ अशा मोठ्या फरकाने बाजी मारली. पहिल्या सेटमध्ये पीव्ही सिंधूने बाजी मारल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये चीनची वांग जोरदार झुंजार येणार हे मात्र नक्की होते. झाले ही तसेच, चीनच्या वांगने पी व्ही सिंधू वर आक्रमक खेळ करत दुसऱ्या सेटमध्ये ११-२१ बाजी मारली.

दोघींनी एक-एक सेट जिंकल्याने तिसरा सेट चुरशीचा होणार होता, आणि झालाही तसाच. तिसऱ्या सेटमध्ये वांगने काहीशी आघाडी घेतली होती. मात्र सिंधूने हार न मानता जबरदस्त स्मॅश करत लॉग रॅलीमध्ये बाजी मारली. सेट ६-५ असा झाला असता नंतरही सिंधूने ताबडतोब २ पॉइंट्स मिळवले.

यावेळी दोघीही उत्तम शॉट्स मारताना दिसल्या. सेट १८-१४ असा असताना चिनी खेळाडू हार मानायला तयार नव्हती, मात्र तिने केलेल्या चुकीमुळे सिंधूला फायदा झाला. हा सेट भारताच्या स्टार बॅडमिंटमपटूने २१-१५ असा जिंकत आपल्या कारकिर्दीमध्ये आणखी एका विजेतेपदाची भर घातली आहे. पीव्ही सिंधूने याअगोदर ‘कोरिया ओपन’, त्यानंतर ‘स्विस ओपन’ आणि आता कारकिर्दीत पहिल्यांदाच ‘सिंगापूर ओपन’ ही स्पर्धा जिंकली आहे.

See also  तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय हॉकी संघ सेमीफायनल मध्ये

इंग्लंडच्या बर्मिंघम येथे २८ जुलैला सुरु होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पी. व्ही. सिंधू भारतीय बॅडमिंटन संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे आता तिने मिळविलेल्या या विजेतेपदामुळे तिच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. २७ वर्षांच्या पीव्ही सिंधूने या स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याने सर्वच भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत.