पुणे :
शेतीसाठी कॅनॉलमधून दोनदा पाणी सोडल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा केवळ २.७६ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका कमी पाणीसाठा राहिला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे शहराला येत्या सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणी कपातीबाबत आज, शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली असून, त्यामध्ये पाणीकपातीचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. पुढील आठ दिवस तरी दिवसा आड पाणी मिळणार आहे.
धरणांतील पाणी गेले कुठे?
‘पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील सध्याचा पाणीसाठा पाहता अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने पाणीवापर काटकसरीने करण्यासाठी पाणीकपात करावी,’ असा सल्ला जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्राद्वारे दिला आहे. जलसंपदा विभागाने गेल्या काही महिन्यांत शेतीसाठी दोन उन्हाळी आवर्तने घेतली. त्याचा फटका पुणेकरांना बसत आहे. गेल्या वर्षी या महिन्यात धरणसाखळीत सुमारे ५.६६ टीएमसी पाणीसाठा राहिला होता. या वेळी केवळ २.७६ टीएमसी पाणीसाठा राहिला आहे.
‘जलसंपदा’चे म्हणणे काय?
जलसंपदा विभागाने महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना पत्र पाठवले आहे. ‘पावसाळा कालावधीत (एक जूनपासून) आतापर्यंत अत्यंत कमी पाऊस पडला आहे. जलसंपदा विभागाने पिण्यासाठी; तसेच सिंचनासाठी धरणसाठ्यातील पाण्याचे १५ जुलैपर्यंतचे नियोजन केले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीत सध्या केवळ २.७६ टीएमसी पाणी शिल्लक आहे. बाष्पीभवन, धरणाच्या परिसरातील पाणीवापर पाहता शहराला पिण्यासाठी कमी पाणी मिळणार आहे. पुणे महापालिकेचा सध्याचा पाणीवापर असाच सुरू राहिल्यास आणि पाऊस लांबणीवर पडल्यास पिण्यासाठी पाणी शिल्लक राहणार नाही,’ अशी भीती जलसंपदा विभागाने वर्तविली आहे.
अखेर पाणीकपातीचा निर्णय
महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली. त्यामध्ये पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. हा पाणीपुरवठा कसा होणार, याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. दिवसा आड पाणी मिळणार आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे शहरात सोमवारपासून पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे वेळापत्रक येत्या दोन दिवसांत नागरिकांना कळविण्यात येईल. पाऊस लांबणीवर पडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला, तर पाणीकपातीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येईल.
– विक्रमकुमार, आयुक्त, महापालिका