बंडखोर १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची उद्धव ठाकरेंची मागणी..

0
slider_4552

मुंबई :

एकनाथ शिंदेंविरोधात उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत, १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आता उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. डेप्युटी स्पीकर्सना चिठ्ठी लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहून उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे.

१२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी का?

महाविकास आघाडीकडे तिन्ही पक्ष मिळून १६२ आमदार आहेत. अशात ३७ आमदारांनी बंड पुकारलं आहे. १६२ पैकी १२ आमदारांचं निलंबन झालं तर १५० ची संख्या राहते. म्हणजेच बहुमताची संख्या राहिल. यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संजय शिरसाठ, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, भारत गोगावले यांच्यासह बारा नावं या पत्रात आहेत. या सगळ्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातला हायव्होल्टेज ड्रामा दिवसभर सुरूच होता. एकनाथ शिंदेंनी शिवसेना नेतृत्वाला आव्हान देत बंड पुकारलं आहे. आपल्याकडे शिवसेना आणि अपक्ष मिळून ४५ आमदारांचं बळ आहे. या सगळ्यात आता उद्धव ठाकरेंनी उपसभापतींना पत्र लिहून १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून या बंडखोर आमदारांना संदेश दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे सांगितलं होतं की बंडखोरी करू नका आसामहून इथे परत या. त्यानंतर माझ्याशी चर्चा करा, काय मागण्या आहेत ते सांगा. मी मुख्यमंत्रीपदी राहायचं नसेल तर मी राजीनामा देतो. तुम्ही म्हणत असाल तर मी शिवसेनेचं पक्षप्रमुख पदही सोडतो. मात्र जे काही बोलायचं आहे समोरासमोर बोला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

मात्र यानंतर एकनाथ शिंदे यांनी एका आमदाराचं पत्र ट्विट करत सगळ्या आमदारांमध्ये याच भावना आहेत असं म्हटलं होतं. त्यानंतर दिवसभर विविध घडामोडी घडत होत्याच. आता उद्धव ठाकरे यांनी १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.

See also  संप मिटेना म्हणून एसटीचं खासगीकरण होण्याची शक्यता