शिवाई क्रीडा मंडळाच्या रौप्य महोत्सव कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात चेतक स्पोर्ट्स क्लब बालेवाडी, महिला गटात राजमाता जिजाऊ संघ विजेते..

0
slider_4552

पुणे :

शिवाई क्रीडा मंडळाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने शाहू स्पोर्ट्स क्लब आणि शिवाई स्पोर्ट्स क्लब च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत चेतक स्पोर्ट्स क्लब बालेवाडी ह्यांनी पुरुष राजमाता जिजाऊ संघाने महिला गटात विजेतेपद मिळवले.
शाहू कॉलेज परिसरातील कर्मवीर हिरे प्रशालेच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या.

पुरूष गटामध्ये अतिशय रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात चेतक स्पोर्टस् क्लब बालेवाडी संघाने राकेश भाऊ घुले संघाचा समीर ढोकले च्या जोरदार चढाया आणि बालाजी जाधव व आशिष पाडाळे यांची त्याला मिळालेली सुरेख साथ याच्या जोरावर ३३-३१ असा दोन गुणांनी पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले.

तर महिला गटांच्या अंतिम सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने राजा शिवछत्रपती संघाचा 38 27 असा पराभव करत विजेतेपद मिळवले. विजयी संघाकडून सलोनी गजमल आणि मंदिरा कोमकर यांनी सुरेख खेळ केला तर पराभूत संघाकडून मानसी रोडे आणि अल्परा मेमने यांनी चांगला खेळ केला विजय होण्यासाठी प्रयत्न केले.

शिवाई क्रीडा मंडळ चे राजेंद्र आंदेकर, भाऊसाहेब करपे, शीतल मारणे (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त), प्रा. डॉ. मिलिंद जाधव आणि यांनी स्पर्धेचे संयोजन केले. शाहू स्पोर्ट्स क्लब आणि शिवाई स्पोर्ट्स क्लबच्या सर्व खेळाडूंनी स्पर्धा यशस्वी करण्यात कठोर परिश्रम घेतले.

स्पर्धेतील विजेत्या पुरुष संघास रोख रक्कम 21 हजार रुपये आणि आकर्षक करंडक देऊन गौरविण्यात आले. उपविजेत्या संघास रोख रक्कम अकरा हजार रुपये तर तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावरील संघास सात हजार रुपये पारितोषिक देण्यात आले.

पुरूष गट तृतीय/चतुर्थ क्रमांक – महाराष्ट्र संघ रहाटणी/नु.म.वि. संघ पुणे

महिला गट तृतीय/चतुर्थ क्रमांक – शिवओम संघ/एमएच संघ

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू : समीर ढोकले (पुरुष), मंदिरा कोमकर (महिला)
उत्कृष्ट चढाई : कृष्णा शिंदे (पुरुष), अल्परा मेमने (महिला)
उत्कृष्ट पकड : विशाल ताटे (पुरुष), निकिता पडवळ (महिला)

See also  'जायका'प्रकल्प उभाणीसाठी केवळ बैठका : मोहन जोशी