मुंबईत लवकरच सरकारी कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार : राजेश टोपे

0
slider_4552

मुंबई :

कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांची वाढती मागणी लक्षात घेऊन मुंबईत लवकरच सरकारी कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे.

कौशल्य शिक्षणाचा फायदा राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी सॅटेलाइट सेंटरची निर्मिती करण्यात येईल,’ अशी माहिती आरोग्य; तसेच कौशल्यविकास मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

शालेय अभ्यासक्रमात कौशल्य विषयाचा समावेश करणार

‘राज्यात कौशल्य विद्यापीठाची निर्मिती करण्यासाठी डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या अहवालानुसार अनेक शिफारशींवर काम झाले असून, काहींवर निर्णय घेणे अपेक्षित आहे. जर्मनीत विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीपासून कौशल्य अभ्यासक्रम शिकवला जातो. त्या धर्तीवर आपल्याकडेही शालेय अभ्यासक्रमात कौशल्य विषयाचा समावेश करण्याचा विचार करण्यात आला आहे,’ असे टोपे यांनी सांगितलं आहे.

गृहिणी, तरुण, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार फायदा

कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून गृहिणी, तरुण आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त प्रशिक्षण देण्यात येते. तसेच कमी कालावधीचे अभ्यासक्रमही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यापीठात सिम्बायोसिस सेंटर फॉर ऑनलाइन लर्निंगची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राद्वारे मोबाइल अॅपच्या माध्यमातून कमी खर्चात ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या विद्यापीठाच्या माध्यमातून प्रमाणपत्र, पदविका, पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतात. या अभ्यासक्रमांत वाढ करण्यासोबतच विद्यार्थ्यांना इनोव्हेशन, स्टार्टअप निर्मिती करण्यासाठी ‘पीपीपी’ तत्त्वावर उपक्रम राबविण्याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. कौशल्य शिक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स या विषयांचा समावेश होणे गरजेचे आहे. सॅटेलाइट सेंटरची स्थापना ठिकठिकाणी झाल्यास, त्या माध्यमातून विद्यापीठातील उत्तम अभ्यासक्रम शिकण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळेल,’ असेही टोपे म्हणाले. कौशल्य शिक्षणात सुधारणेला वाव असल्याने, राज्यातील तज्ज्ञ, अभ्यासक, विद्यार्थी, नागरिक यांनी सरकारला सूचना कराव्यात, असे आवाहनही मंत्री राजेश टोपे यांनी केले.

See also  देशाला महासत्ता बनवायचं असेल तर त्यासाठी विद्यार्थी घडविणे आवश्यक : नितीन गडकरी