मुंबई :
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार स्वीकारून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला समर्पित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतल्या कार्यक्रमात लतादीदींच्या अनेक आठवणी देखील जागविल्या.
चार दशकांपूर्वी पहिल्यांदी संगीतकार सुधीर फडके यांनी आपला परिचय लता मंगेशकरांची करून दिला होता याची आठवण मोदींनी सांगितली. लतादीदी आपल्यासाठी मोठी बहिण होत्या. लतादीदींच्या व्यक्तिमत्त्वात संगीतासह देशभक्तीचा अनोखा मिलाफ झाला होता. त्यांनी सावरकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरती सह समर्थ गुरु रामदासांच्या शिवकल्याणराजा गीतांना अमर केले. एवढेच नाही तर शंकराचार्यांची स्तोत्रे तिरुपती बालाजी च्या भक्ती गीते मिराबाई नरसी मेहता यांची भजने सादर करून लतादीदींनी अध्यात्मिक सेवा बजावली असेही मोदी म्हणाले.
लतादीदींच्या संगीत साधनेत साक्षात सरस्वतीचा वास होता. सुमारे आठ दशके लतादीदींनी आपल्याला या आवाजातून सर्व भारतीय समाजात चैतन्य जागवले, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी काढले. देशभक्तीचा हा वारसा त्यांना आपले पिताश्री मास्टर दीनानाथ यांच्याकडून मिळाला होता याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. लताजींनी त्यांच्या नावाने पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय उभे करून गरीबांच्या सेवेचा वारसा पुढे चालू ठेवला. कोरोना काळात या रुग्णालयाने गरीब रुग्णांची अविरत सेवा केल्याचा गौरव मोदींनी केला.
एक चुकीचा संदर्भ
मात्र, त्याचवेळी मोदींच्या मुखातून एक संदर्भ चुकीचा गेला. मास्टर दीनानाथ यांनी व्हाईसराय समोर सिमल्या मध्ये वीर वामनराव जोशी यांचे रणदुंदूभी नाटकातले “परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला” हे गीत गायले होते. मात्र मोदींच्या मुखातून हे गीत सावरकरांचे असल्याचा चुकीचा संदर्भ येऊन गेला.