गांधीनगर :
एकीकडे अनेक देशांत महागाईचा भडका उडाल्याने अन्नधन्याच्या किमती वाढल्या आहेत. तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक देशांमध्ये सध्या अन्नधान्याची टंचाई जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत अन्नटंचाईच्या समस्येवर चर्चा केली. या वेळी त्यांनी जगाला अन्नसाठा पुरवण्यास भारत तयार असल्याचे बायडेन यांना सांगितले. जागतिक व्यापार संस्थेची मान्यता असल्यास भारत जगाला अन्नपुरवठा करू शकतो, असे मोदी यांनी सांगितले.
अदलज येथील अन्नपूर्णा धाम ट्रस्टच्या वसतिगृह आणि शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले. त्या वेळी ते बोलत होते. ‘रशिया-युक्रेन युद्धामुळे जगातील अनेक भागांत सध्या अन्नाचा तुटवडा जाणवत आहे. जगाला सध्या नव्या समस्येला तोंड द्यावे लागत असून, जगातील अन्नसाठा संपत आला आहे. यासंदर्भात आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनीही हा मुद्दा उपस्थित केला.
जागतिक व्यापार संस्थेने परवानगी दिल्यास भारत उद्यापासून जगाला अन्नसाठा पुरवण्यास तयार आहे’, असे त्यांनी सांगितले. देशात पुरेसा अन्नसाठा असून, आमच्या शेतकऱ्यांनी जगाला अन्नपुरवठा करण्यासाठी व्यवस्था केली आहे. असे असले तरी जागतिकस्तरावरील कायद्यानुसार आपण कार्यवाही करू. त्यामुळे जागतिक व्यापार संस्था परवानगी कधी देणार आणि भारत जगाला अन्नसाठ्याचा पुरवठा कधी करू शकणार हे माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.