मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची घेतली भेट.

0
slider_4552

मुंबई :

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आपल्या भूमिकेमुळे नाराज झालेले मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सोमवारी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली.

या भेटीत झालेल्या चर्चेमुळे आपण समाधानी असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नाही, तर ठाण्यातल्या सभेचे देखील आपल्याला निमंत्रण दिले असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.

मशिदींवरील भोंग्यांविरोधी वक्तव्यामुळे मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोमवारी मोरे यांना भेटीसाठी बोलावले होते. या भेटीनंतर आपले समाधान झाल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. तसेच आपल्याला ठाण्यातील सभेसाठी राज ठाकरे यांनी आमंत्रित केले आहे. या सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे देखील मोरे म्हणाले.

वसंत मोरे यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर त्यांचे पुणे शहराध्यक्षपद साईनाथ बाबर यांना देण्यात आले होते. त्यामुळे आता वसंत मोरे मनसेला जय महाराष्ट्र म्हणणार का?, अशा चर्चांना उधाण आले होते. पण मनसेमध्ये कोणाला कुठले पद द्यायचे हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय असतो. माझ्या शहराध्यक्ष पदाचा कार्यकाळ हा 11 महिन्यांचा होता, तो 3 मार्च 2022 रोजी संपला. त्याबाबत मी राज ठाकरे यांना सांगितले होते. वसंत मोरे हा साधा कार्यकर्ता आहे, मनसे हा फार मोठा पक्ष आहे. त्यामुळे वसंत मोरे गेल्याने पक्षाला काही फरक पडणार नाही. पण वसंत मोरे पक्ष सोडून जाणारच नसल्यामुळे वसंत मोरे गेल्याने पक्षाला फरक पडेल या चर्चांना काही अर्थ नसल्याचे मोरे यांनी सांगितले आहे.

माझ्या विधानाचा विपर्यास

ज्या मतदारसंघातून मी निवडून येतो त्या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे आपल्याला अडचण होऊ शकते, असे मत मोरे यांनी मांडले होते. पण माझ्या या विधानाचा विपर्यास आमच्या पक्षातील काही लोकांनी केला. काही लोक वसंत मोरे कसा वाईट आहे, हे साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. पण मी राज ठाकरे आणि मनसे पक्षावर कधीही नाराज होऊ शकत नाही, असे मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

See also  बाईच्या डोक्यावर अपघात झालाय का भाऊ ? उर्मिला मातोंडकर

माझा राज ठाकरेंवर विश्वास

मी मांडलेल्या भूमिकेमुळे सर्वच पक्षातील नेत्यांनी मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण मी केवळ मनसेचा आहे, हेच मी सगळ्यांना सांगितलं. माझी जी काही अडचण आहे ती मी राज ठाकरे यांना सांगणार आहे, ती ऐकून घेऊन राज ठाकरे त्यावर काय मार्ग काढायचा हे नक्कीच मला सांगतील हा विश्वास नाही तर खात्री आहे. माझा माझ्यावर नाही त्यापेक्षा जास्त विश्वास राज ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वार आहे, असे देखील वसंत मोरे यावेळी म्हणाले.