श्रीलंकेत भीषण आर्थिक संकट, सर्व मंत्र्यांचे सामूहिक राजीनामे.

0

श्रीलंका :

श्रीलंकेत सध्या देशातील भीषण आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता सरकारमधील सर्व मंत्र्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.

यात महिंदा राजपक्षे यांचा मुलगा आणि क्रीडा मंत्री नमल राजपक्षे यांचाही समावेश आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. दरम्यान, महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला नाही.

आतापर्यंतच्या सर्वांत बिकट आर्थिक संकटाचा सामना श्रीलंका करत आहे. श्रीलंकेत एक एप्रिलपासून आणीबाणी लागू झाल्याची घोषणा करण्यात आली होती. देशात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्री एक मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर श्रीलंकेचे शिक्षणमंत्री दिनेश गुणवर्धने यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता सर्व २६ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.

सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर लवकरच नवीन मंत्रिमंडळाची स्थापना केली जाणार असून यात विरोधी पक्षातील सदस्यांचा समावेश असेल, अशी सूत्रांची माहिती आहे. देशातील सुव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी एक अंतरिम सरकार नियुक्त केले जावे, असा प्रस्तावही काही संघटनांनी दिला असल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, देशातील भीषण आर्थिक संकटाच्या (economic crisis) पार्श्वभूमीवर ३६ तासांच्या देशव्यापी संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल, तसेच सरकारविरोधी रॅली आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल रविवारी देशाच्या पश्चिम प्रांतात ६०० हून अधिक निदर्शकांना अटक करण्यात आली.

सरकारने शनिवार व रविवारी जाहीर केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी विरोधी पक्षाचे नेते साजिथ प्रेमदासा यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी येथील ऐतिहासिक स्वातंत्र्य चौकाकडे निषेध मोर्चा काढला होता. आंदोलनांचे पूर्वनियोजित वेळापत्रक लक्षात घेऊन सरकारने शनिवार व रविवार संचारबंदी जाहीर केली होती. ‘कोलंबो गॅझेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रविवारी पश्चिम प्रांतात एकूण ६६४ जणांना अटक करण्यात आली आहे.

See also  रेल्वे कर्मचाऱ्यांना आता २ शिफ्टमध्ये काम करण्याच्या सूचना : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव