स्वीडन :
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने स्विस ओपन ही स्पर्धा जिंकली. स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा सरळ सेटमध्ये पराभव केला. सिंधूने ओंगबामरुंगफानला २१-१६, २१-८ असे हरवले. अंतिम सामना सिंधूने ४९ मिनिटांत जिंकला. सिंधू जिंकली पण प्रणॉय हरला. भारताचा एचएस प्रणॉय इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्ती विरुद्धच्या स्विस ओपन सुपर ३००च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात हरला. इंडोनेशियाच्या बॅडमिंटनपटूने प्रणॉयचा १२-२१, १८-२१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य आणि टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या सिंधूने ओंगबामरुंगफान विरुद्धचे १७ पैकी १६ सामने जिंकण्याची किमया करून दाखवली. सिंधू ओंगबामरुंगफान विरुद्ध फक्त २०१९च्या हाँगकाँग ओपन स्पर्धेत हरली होती.
मागच्या वेळी स्विस ओपन सुपर ३०० स्पर्धेत सिंधू हरली होती. सिंधूला रिओ ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने हरवले होते.
स्विस ओपन सुपर ३०० स्पर्धेचा अंतिम सामना सेंट जेकबशाले येथे झाला. याच ठिकाणी सिंधू २०१९ मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकली होती.
सिंधू २६ वर्षांची गुणी खेळाडू आहे. यंदाची स्विस ओपन सुपर ३०० स्पर्धा जिंकण्याआधी ती जानेवारी २०२२ मध्ये लखनऊ येथे सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर ३०० ही बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती.