नवी दिल्ली :
जागतिक घडामोडींचा भारतीय शेअर (Indian share market) बाजारावर मोठा परिणाम पाहायला मिळाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात सातत्याने घसरण सुरू होती.
मात्र, शेवटच्या काही तासांमध्ये प्रचंड घसरण झाली. शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)चा सेन्सेक्स व नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी दिवसभर लाल चिन्हावर होता. सेन्सेक्स 1024 अंकांच्या प्रचंड घसरणीसह 57,621 अंकावर बंद झाला, त्याच वेळी निफ्टी 303 अंकांच्या घसरणीसह 17214 वर बंद झाला..
आज सकाळची सुरुवातच घसरणीने झाली. ‘बीएसई’चा ‘सेन्सेक्स’ 92 अंकांनी घसरून 58,552 अंकावर उघडला. निफ्टी 25 अंकांनी घसरून 17,491 अंकांवर उघडला. व्यापार सुरू झाल्यानंतरही त्यात सातत्याने घटच नोंदवली गेली. दुपारी तर सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरुन 57,336 च्या पातळीवर गेला. त्यामुळे एका फटक्यात गुंतवणूकदारांचे तब्बल 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. ‘एचडीएफसी’ बँक आणि ‘एल अँड टी’चे समभाग 3-3 टक्क्यांपर्यंत घसरले. ‘सेन्सेक्स’च्या 30 पैकी 3 समभाग वधारत आहेत, तर 27 समभाग घसरणीत आहेत.
निफ्टीवर ऑटो, बँक, फायनान्स, रियल्टी शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. ऑटो इंडेक्समध्ये 1.5 टक्के, बँक आणि फायनान्शियल निर्देशांकात 2.5 टक्के घसरण नोंदविली गेली. ‘एफएमसीजी’ निर्दशांकात (FMCG Index) 2 टक्क्यांहून अधिक, तर आयटी व फार्मा निर्देशांकात 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ‘बीएसई’वर सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांचा मार्केट कॅप 3 लाख कोटींनी घसरला.
केंद्रिय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर झाल्यानंतर शेअर बाजारात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. अर्थसंकल्पानंतर अवघ्या दोनच दिवसात शेअर बाजार स्थिर स्थावर झाल्याचे चित्र दिसत होते. मात्र, त्यानंतर आठवडाभरातच शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले.. प्रमुख वित्तीय संस्थांचे आर्थिक तिमाही अहवाल (Q3 Results) पटलावर येत असल्याने गुंतवणुकदारांनी सावधगिरीचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे.
तेजीतील शेअर्स- पॉवर ग्रिड कॉर्प (1.88), ओएनजीसी (1.47), एनटीपीसी (0.71), श्री सिमेंट (0.57), टाटा स्टील (0.57)
घसरणीचे शेअर्स- टीसीपी (-3.95), एचडीएफसी बँक (-3.66), एचडीएफसी लाईफ (-3.38), लार्सेन (-3.26), बजाज फायनान्स (-3.18)..
शेअर बाजारावर अर्थसंकल्पातील घोषणांचा प्रभाव अल्प काळ टिकला. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक समितीच्या बैठकीला आजपासून सुरुवात झाली आहे. बुधवारी चलनविषयक धोरण घोषीत केले जाणार आहे. अर्थतज्ज्ञांनी रिझर्व्ह बँकेचं धोरण स्थिर राहणार असल्याचं म्हटलं आहे. रिव्हर्स रेपो दरात घट आणि रेपो दर स्थिर अशी शक्यता अर्थवर्तृळाने वर्तविली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांत चलबिचल निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.