उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड मैदान येथे राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला दिली मानवंदना

0
slider_4552

पुणे :

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस परेड मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पोलीस अधिकारी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भिला चौधरी, पांडुरंग लक्ष्मण वांजळे, विजय उत्तम भोंग तसेच उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अशोक रामचंद्र मोरे, सहायक पोलीय आयुक्त बजरंग देसाई, पुणे महानगरपालिका उपायुक्त नितीन उधास यांचा सन्मान करण्यात आला.

पुणे जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जुन्नर प्रकल्पांतर्गत ओतूर ग्रामपंचायतीतील मोमिन गल्ली या अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी सेविका रेश्मा गनी मोमिन यांना उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांक, पेठ प्रकल्पांतर्गत पेठ ग्रामपंचायतीतील माळीवस्ती अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका विजया लिलाधर थोरात यांना द्वितीय क्रमांक आणि पुरंदर प्रकल्पांतर्गत चांबळी ग्रामपंचायतीच्या चांबळी क्र. 3 अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका अनिता गोकुळ भिसे यांना तृतीय क्रमांक मिळाल्याने त्यांचाही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

See also  पाचवी ते आठवीच्या शाळा येत्या एक फेब्रुवारी पासून