मुंबई :
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर टोल वसुलीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा संशय माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी व्यक्त केला आहे.
एक्सप्रेस वे वरील टोल वसुलीची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
माहिती अधिकारात वेलणकर यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील टोल वसुलीची आकडेवारी मागितली होती. माहिती आयुक्तांनी माहिती मिळवण्यासाठीचा अर्ज मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला माहिती देण्याचे निर्देश दिले. महामंडळाने माहिती देताना दररोज दहा हजारांहून अधिक वाहने टोल न देता एक्सप्रेस वे वरून जात असल्याचे सांगितले.
नियमानुसार खासदार, आमदार, पोलीस, रुग्णवाहिका, लष्करी वाहने यांना टोल द्यावा लागत नाही. यामुळे आकडेवारी सादर करताना टोलमाफी असलेली वाहने आणि टोल न देता निघू जाणारी वाहने अशी स्वतंत्र वर्गवारी करून आकडेवारी देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात टोल न देता एक्सप्रेस वे वरून जाणारी वाहने या प्रकारात एकत्रितपणे दररोज दहा हजारांपेक्षा जास्त वाहने जातात असा उल्लेख आहे. यामुळे नेमका किती टोल वसूल केला याचे आकडे लपविण्यासाठी गडबड केली जात असल्याचा संशय माहिती अधिकार कार्यकर्ते वेलणकर यांनी व्यक्त केला.
दररोज टोलमाफी असलेली दहा हजार वाहने एक्सप्रेस वे वरुन जाणे अशक्य वाटते. टोल वसुलीचे नेमके आकडे जाहीर करावे लागू नये यासाठी माहितीची सरमिसळ सुरू आहे. यापेक्षा टोल न देता जाणारी एकूण वाहने यापैकी टोल माफी असलेली वाहने आणि इतर वाहने अशी सविस्तर आकडेवारी जाहीर केली पाहिजे. जर ही आकडेवारी जाहीर केली जात नसेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात चौकशी करावी; अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते वेलणकर यांनी केली. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे; असेही माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर म्हणाले.