जोहान्सबर्ग:
दक्षिण अफ्रिकेतील मालिका पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी संध्याकाळी विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं असल्याची घोषणा केली आहे.
विराट कोहलीने ट्विटरवर एक मेसेज शेअर करून याची घोषणा केली आहे.
विराट कोहलीने आपल्या मेसेजमध्ये लिहिलं की, ‘गेली सात वर्षे सातत्याने मेहनत आणि दैनंदिन प्रयत्नांमुळे संघाला योग्य दिशेने नेले जात आहे. मी माझे काम प्रामाणिकपणे केले आणि कोणतीही कसर सोडली नाही. पण प्रत्येक प्रवासाचा शेवट असतो, माझ्यासाठी कसोटी कर्णधारपद संपवण्याची हीच योग्य वेळ आहे.’
विराट कोहलीने आपल्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, ‘या प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण प्रयत्नात कोणीही कसर केली नाही. मी नेहमीच माझे 120 टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे, जर मी काही करू शकत नाही तर मला वाटते की ती गोष्ट माझ्यासाठी योग्य नाही.’
‘या निर्णयावर मला पूर्ण खात्री आहे आणि मी आपल्या संघाची फसवणूक करू शकत नाही.’ या मेसेजमध्ये विराट कोहलीने बीसीसीआयचे आभार मानले, तसेच रवी शास्त्री आणि उर्वरित सपोर्ट स्टाफचेही आभार मानले आहेत.
BCCIने विराट कोहलीला दिल्या शुभेच्छा
बीसीसीआयने विराट कोहलीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. विराटच्या ट्विटनंतर काही वेळातच बीसीसीआयचे ट्विट समोर आलं आहे. ज्यामध्ये बोर्डाने विराटला त्याच्या कसोटी कर्णधारपदाच्या आजवरच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय कसोटी कर्णधार म्हणून 40 सामने जिंकण्याच्या विक्रमाबद्दल बीसीसीआयने विराट कोहलीचे अभिनंदनही केले आहे.
विराट कोहलीने आधीच टी-20, वनडेचे कर्णधारपद सोडले आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती, भारताच्या पराभवानंतर बीसीसीआयने त्याला वनडेच्या कर्णधारपदावरूनही दूर सारलं होतं. ज्यामुळे विराट नाराज झाला होता. आता द. अफ्रिकेवर विराट कसोटी संघाचा कर्णधारही नाही.
भारतासाठी सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार
रेकॉर्डनुसार विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. विराटने एकूण 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून त्यापैकी 40 सामने जिंकले आहेत आणि 17 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली एकूण 11 सामने अनिर्णित राहिले आहेत.
सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार
• विराट कोहली – 40 कसोटी विजय
• एमएस धोनी – 27 कसोटी विजय
• सौरव गांगुली – 21 कसोटी विजय
कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीची कामगिरी
टेस्ट – 68
डाव – 113
धावा – 5864
सर्वोच्च धावा – 254*
सरासरी – 54.80
शतकं – 20
अर्धशतकं – 18
कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक धावा
विराट कोहली, 68 कसोटी – 5864 धावा
एमएस धोनी, 60 कसोटी – 3454 धावा
सुनील गावस्कर, 47 कसोटी – 3449 धावा
मोहम्मद. अझरुद्दीन, 47 कसोटी – 2856 धावा
सौरव गांगुली- 49 कसोटी-2561 धावा
सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार (कर्णधार म्हणून किमान 20 कसोटी) % विजय
71.93 – स्टीव्ह वॉ 57-41-9-7 (सामना-विजय-पराजय-ड्रॉ)
62.50 – डॉन ब्रॅडमन (25-15-3-6)
62.34 – रिकी पाँटिंग (77-48-16-13)
58.82 – विराट कोहली (68-40-17-11)