नवी दिल्ली :
भारतीय सैन्य दलात महिला अधिकाऱ्यांना पर्मनंट कमिशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार काही महिला अधिकाऱ्यांना पर्मनंट कमिशन देखील दिले आहेत.
आज भारतीय टपाल खात्याने या महत्त्वाच्या आणि क्रांतिकारी निर्णय अनोख्या पद्धतीने सलाम केला आहे. भारतीय टपाल खात्याने महिला अधिकार्यांना पर्मनंट कमिशन देण्याच्या निर्णयाचा सन्मान करण्याच्या दृष्टीने चार टपाल तिकिटे जारी केली आहेत.
लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी यांच्या हस्ते आज लष्कर दिनानिमित्त झालेल्या खास कार्यक्रमात या टपाल तिकिटांचे अनावरण केले. भारतीय महिला अधिकाऱ्यांचे सैन्यदलातील योगदान या टपाल तिकीटांमधून दर्शवण्यात आले आहे. सैन्यदलात भारतीय महिला अधिकाऱ्यांचे पुरुष अधिकाऱ्यांच्या बरोबरीचे योगदान आहे हेही यातून दिसून येत आहे.