केपटाऊन :
दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका शुक्रवारी संपली. मालिकेत दक्षिण अफ्रिकेने चांगल्या प्रकारे पुनरागमन करत विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत विजय मिळवू शकेल, अशी सर्वांनीच अपेक्षा होती.
परंतु, दक्षिण अफ्रिका संघाच्या खेळाडूंनी अप्रतिम प्रदर्शन करत मालिका नावावर केली. या पराभवानंतर भारताचे दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगले.
उभय संघातील या तीन सामन्यांच्या मालिकेत अफ्रिकी संघाने २-१ असा विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिला सामना सेंचुरियनमध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताने ११३ धावंनी मोठा विजय मिळवला आणि १-० अशी आघाडी घतेली होती. त्यानंतर उभय संघातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गमध्ये खेळला गेला. दक्षिण अफ्रिकेने या दुसऱ्या सामन्यामध्ये सात विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात देखील अफ्रिकेने विजय मिळवत मालिका नावावर केली.
केपटाऊनमधील सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला असता, तर दक्षिण अफ्रिकेच्या धरतीवर पहिल्यांदाच कसोटी मालिका देखील जिंकली असती. दक्षिण अफ्रिकेतील भारतीय संघाच्या कसोटी प्रदर्शनाचा विचार केला, तर ते निराशाजनक राहिले आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारताने आतापर्यंत खेळलेल्या कसोटी मालिकांपैकी एकही जिंकलेली नाही.
दक्षिण अफ्रिकेत भारतीय संघाने खेळलेल्या कसोटी मालिका –
१९९२/९३ – भारतीय संघ पराभूत (०-१) कर्णधार- मोहम्मद अजहरुद्दिन
१९९६/९७ – भारतीय संघ पराभूत (०-२) कर्णधार- सचिन तेंडुलकर
२००१/०२ – भारतीय संघ पराभूत (०-१) कर्णधार- सौरव गांगुली
२००६/०७ – भारतीय संघ पराभूत (१-२) कर्णधार- राहुल द्रविड
२०१०/११ – मालिका अनिर्णीत (१-१) कर्णधार- एमएस धोनी
२०१३/१४ – भारतीय संघ पराभूत (०-१) कर्णधार- एमएस धोनी
२०१७/१८ – भारतीय संघ पराभूत (१-२) कर्णधार- विराट कोहली
२०२१/२१ – भारतीय संघ पराभूत (१-२) कर्णधार- विराट कोहली व केएल राहुल
दरम्यान, उभय संघातील कसोटी मालिकेचा तिसरा सामना ११ जानेवारीला केपटाऊनमध्ये सुरू झाला होता. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांसाठी या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे होते. या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व केल्याचे पाहायला मिळाले. सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ २२३, तर दक्षिण अफ्रिका संघ २१० धावांवर सर्वाबाद झाला. पहिल्या डावात १३ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात भारताने १९८ धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. अफ्रिकी संघाने सात विकेट्स राखून हे लक्ष्य गाठले. यानंतर दक्षिण अफ्रिकेने मायदेशातील भारताविरुद्ध कसोटी मालिकेत जिंकण्याची परंपरा देखील कायम राखली.