दुबई :
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (DIA) मोठी दुर्घटना टळली. दुबईहून भारतात येणारी दोन विमाने एकाच धावपट्टीवर आली, त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने (एटीसी) तातडीने एका विमानाला धावपट्टीवरून हटवण्याच्या सूचना दिल्याने शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. हे प्रकरण गांभीर्याने घेत एमिरेट्स एअरलाइन्सने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विमान कंपन्यांनीही क्रू मेंबर्सची अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
फ्लाइट EK-524 हे रात्री ९.४५ वाजता दुबईहून हैदराबादला उड्डाण करणार होते. याशिवाय ईके-५६८ हे विमान दुबईहून बेंगळुरूला जाणार होते. दोन्ही फ्लाइटच्या टेकऑफ वेळेत ५ मिनिटांचा फरक होता. मात्र दुबई-हैदराबाद विमान टेकऑफसाठी तयार असताना त्याच दिशेने दुसरे विमान वेगात येत असल्याचे क्रूच्या लक्षात आले. यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) तात्काळ माहिती देण्यात आली. एटीसीने तत्परता दाखवत विमान धावपट्टीवरून टॅक्सीवेकडे वळवण्याचे निर्देश दिले. चालकाने तातडीने हे काम केल्याने अपघात टळला.
एमिरेट्स एअरलाइन्सने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सुरक्षेतील ही त्रुटी मान्य केली आहे. एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर दुबईहून बंगळुरूला जाणार्या फ्लाईटने आधी टेकऑफ केले आणि त्यानंतर हैदराबादला जाणार्या फ्लाइटने टेक ऑफ केला. ही बाब समोर येताच विमान प्राधिकरणाने गांभीर्य दाखवत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय फ्लाइटमधील क्रू मेंबर्सविरोधात अंतर्गत चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
प्राथमिक अहवालानुसार, हैदराबादला जाणारे फ्लाइट EK-524 एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या परवानगीशिवाय उड्डाण करत होते, त्यामुळे ही घटना घडली. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल येणे बाकी आहे. दुसरीकडे, एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, “सुरक्षेला नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य असते आणि आम्ही या घटनेचा अंतर्गत आढावा घेत आहोत. UAE AAIS द्वारे देखील याची चौकशी केली जात आहे.”