नाशिक:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि आमदार रोहित पवार यांनी नाशिकमध्ये उत्तर दिले. महाविकास आघाडी सरकारला ५ वर्षे कधी होतील हे तीन-तीन महिने म्हणणाऱ्या भाजपला देखील समजणार नाही, असा टोला पवार यांनी लगावला.
रोहित पवार हे नाशिकमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले असून, या माध्यमातून त्यांनी भाजप, केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राजकारणात आल्यापासून नाशिकला येण्याची ही सहावी-सातवी वेळ आहे. पवार साहेबांवर या जिल्ह्याचं विशेष प्रेम असल्याने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे, असे म्हणाले.
रोहित पवार यांनी भाजपवर आणि भाजपच्या सोशल मीडिया टीमवरही निशाणा साधला. विरोधक हे केवळ विरोध करण्याचे काम करत आहेत. विरोधकांच्या सोशल मीडिया टीमला आर्थिक बळ आहे. विरोधकांकडून छोटे-छोटे विषय लोकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बिंबवले जात आहेत. भाजपच्या सोशल मीडियाला तितक्याच ताकदीने उत्तर द्यायला हवे, असेही पवार म्हणाले.