मुळशी मध्ये आत्माराम कलाटे आणि सुनील चांदेरे यांच्यात जोरदार लढत : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुक

0
slider_4552

पुणे :

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या पंचावार्षिक निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांना दिलासा मिळाला. बॅंकेच्या २१ संचालक पदांपैकी १४ जण बिनविरोध झाले आहेत.

उर्वरित सात जागांसाठी चुरशीची लढत होणार आहे. त्यातही `अ` गटातील हवेली आणि मुळशी या दोन तालुक्यांतील लढत लक्षवेधी राहिल.

जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रकाश म्हस्के यांची हवेलीमधून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विकास दांगट यांच्याशी लढत आहे. राष्ट्रवादीने ही मैत्रीपूर्ण लढत म्हणून जाहीर केले आहे. दुसरीकडे मुळशी मध्ये आत्माराम कलाटे यांचा सामना सुनील चांदेरे यांच्यात होत आहे. शिरूरमध्ये आमदार अशोक पवार यांच्यासमोरील आव्हान कायम राहिले असून त्यांनाही आपली निवड बिनविरोध करण्यता अपय़श आले. त्यामुळे या तीन ठिकाणी मोठी चुरस नजरेस पडणार आहे. खेड तालुक्यात दर वेळी मोठी चुरस या निवडणुकीत दिसते. पण या वेळी तेथे आमदार दिलीप मोहिते यांचे विरोधक शरद बुट्टे पाटील आणि हिरामण सातकर यांनी माघार घेतली. त्यामुळे मोहिते यांचा बिनविरोधच मार्ग सुकर झाला. याशिवाय इंदापूर, जुन्नर येथील निवडीही बिनविरोध झाल्या.

याशिवास सोसायटी-नागरी बॅंक (क) मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद (भाजप) विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते सुरेश घुले (राष्ट्रवादी) अशी लढत आहे. येथे दिलीप मुरकुटे यांनीही अर्ज भरला आहे. अन्य सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे विरुद्ध दादासाहेब फराटे असे एकमेकांच्या विरोधात आहेत. महिलांसाठीच्या दोन जागांसाठी आशा बुचके, पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे अशा तिघीजण रिंगणात आहेत.

पुणे जिल्ह्यातून दिलीप वळसे पाटील (आंबेगाव-शिरुर), अजित पवार (बारामती), संग्राम थोपटे (भोर), दिलीप मोहिते (खेड), संजय जगताप (पुरंदर) आणि दत्तात्रेय भरणे (इंदापूर) अशा सहा तालुक्यांतून सहा विद्यमान आमदार जिल्हा बॅकेवर संचालक म्हणून बिनविरोध म्हणून नियुक्त झाले. विशेष म्हणजे माजी आमदार व विद्यमान अध्यक्ष रमेशआप्पा थोरात (दौंड) यांनीही आपले संचालकपद बिनविरोध करवून घेतले.

See also  खडकवासला धरण ९६ टक्के भरले, नदी पात्रालगत राहणार्‍या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा