राज्यातील कोरोना महासाथीचा सामना करण्यास महाराष्ट्र अव्वल स्थानी : मुंबई उच्च न्यायालय

0

मुंबई :

राज्यातील कोरोना महासाथीचे संकट हाताळण्यावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका होत असताना हायकोर्टाने मात्र कौतुक केले आहे. कोरोना महासाथीच्या संकटाचा सामना करण्यास महाराष्ट्र अग्रस्थानी राहिला असे आम्ही जाहीरपणे सांगू शकतो असे हायकोर्टाने म्हटले.

मुंबई हायकोर्टात कोरोनाकाळातील विविध समस्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. आम्ही हे जाहीरपणे सांगू शकतो की,महाराष्ट्र कोविड 19 चा मुकाबला करण्यात अग्रस्थानी राहिला आहे. आपण ते वाईट दिवस आता विसरायला हवेत असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांनी म्हटले. दरम्यान, कोरोनाकाळातील विविध समस्यांबाबत दाखल याचिका हायकोर्टाने निकाली काढल्या. मुंबईसह राज्यातील रूग्णालयातील खाटांची कमी संख्या, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा, लसीकरणातील समस्या, जेष्ठ नागरीकांना भेडसावणा-या समस्या यासारख्या समस्यांवर बोट ठेवत स्नेहा मरजादी यांच्यासह अन्य काहीजणांनी मुंबई उच्च न्यायालयात विविध जनहित याचिका दाखल केल्या होत्या.

याआधीदेखील हायकोर्टाने काही याचिकांवरील सुनावणीत राज्य सरकार, मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. तर, काही वेळेस कठोर निर्देश देत प्रशासनाला सूचनाही केल्या होत्या.

मुंबईसह राज्यातील रूग्णालयांत खाटांची कमतरता, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा या प्रश्नांवरही हायकोर्टात सुनावणी झाली होती. याचिकांची गंभीर दखल घेत हायकोर्टाने राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मुंबईने केलेल्या प्रयत्नांने इतर महापालिकांनी अनुकरण करण्याची सूचनाही एका सुनावणीत उच्च न्यायालयाने केली होती.

 

See also  मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेनचा समावेश विकास आराखड्यात (पीएमआरडीए) होणार