पुणे :
पुण्यात उद्योग आहेत, मोठमोठ्या शिक्षण संस्था, विद्यापीठे आहेत, आयटी क्षेत्र आहे त्यामुळेच पुण्यात तंत्रज्ञान आणि संशोधनातील प्रगतीला वाव असून स्टार्टअप साठी पुण्याचे वातावरण पोषक आहे, असे मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यापीठ परिसरात स्थापन केलेले एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील स्टार्टअप इकोसिस्टीम चे सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित या सादरीकरण कार्यक्रमादरम्यान पियुष गोयल बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उद्योजकता, कौशल्य विकास आणि रोजगार विभागाच्या प्रधान सचिव डॉ.मनीषा वर्मा, श्रुती सिंग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे, णे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते. यावेळी गोयल यांनी स्टार्टअप विषयी विद्यार्थ्यांचे सादरीकरणही पाहिले.
पियुष गोयल म्हणाले, इनोव्हेशन मधील नव नवीन संकल्पनांसाठी ई व्यासपीठ उपलब्ध करून देणे व आदिवासी क्षेत्रातील कामाला दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्टार्टअप ना धोरणाच्या चौकटीत न बांधता त्याला पाठिंबा द्यायला हवा. स्टार्टअपची परिसंस्था निर्माण करण्यासाठी पुण्यात मुंबईच्या बरोबरीने स्टार्टअप आहेत.
डॉ. अपूर्वा पालकर यांनी विद्यापीठात सुरू असलेल्या स्टार्टअप विषयी माहिती दिली. तसेच महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेले इनोव्हेशन सेन्टर, विद्यापीठाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या इनोव्हेशन विषयक स्पर्धांबाबतही त्यांनी माहिती दिली.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाऊंडेशनबाबत नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर यांनी सादरीकरण केले. व्हेंचर सेंटरचे सादरीकरण व्ही प्रेमनाथ यांनी केले. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कामाविषयी प्रशांत गिरबाने यांनी सांगितले. इनोव्हेशन सोसायटीच्या कामाविषयी भुपेंद्रसिंग खुशवंत यांनी सादरीकरण केले. यावेळी मनीषा वर्मा यांनी स्टार्टअप सुरू करताना येणाऱ्या अडचणी तसेच काही दुरुस्त्या सुचवल्या.