मुंबई :
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करणा-या न्या कैलास चांदीवाल यांच्या एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती समोर परमबीर सिंह आज हजर होत प्रतिज्ञापत्राद्वारे मोठा गौप्यस्फोट करत या सर्व प्रकरणावर पडदा टाकल्याचे म्हटले आहे
माघार घेत देशमुखांना अप्रत्यक्षपणे क्लीन चिट
अनेक दिवस गैरहजर राहिलेल्या परमबीरसिंह यांनी पहिल्यांदाच चौकशी समितीसमोर हजेरी लावली. यावेळी त्यांनी वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले. तसेच न्या चांदीवाल समितीसमोर सादर करण्यास माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत असा मोठा गौप्यस्फोट केला. तसेच, कुठल्या साक्षीदाराची मला उलटतपासणी देखील करायची नाही, असे त्यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामुळे परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपातून अधिकृतरीत्या माघार घेत देशमुखांना अप्रत्यक्षपणे क्लीन चिट दिली आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
केलेले आरोप हे ऐकीव माहितीच्या आधारे
याआधी परमबीरसिंह चौकशीसाठी हजर राहण्यास टाळाटाळ करीत होते. वकिलांच्या मार्फत समितीला हजर राहू शकत नसल्याची माहिती त्यांनी दिली होती. देशमुखांवर केलेले आरोप हे ऐकीव माहितीच्या आधारे केले होते त्यामुळे समितीसमोर येण्याचा काही उपयोग नाही, अशी भूमिका त्यांच्या वकिलांनी घेतली होती. या प्रकरणी प्रतिज्ञापत्राद्वारे सविस्तर बाजू मांडण्याचीही तयारी त्यांनी दाखवली होती. अखेर समितीने परमबीरसिंह यांना चौकशीला हजर राहावे, यासाठी समन्स बजावले होते. त्यांना २९ नोव्हेंबरला चौकशीस हजर राहण्यास बजावण्यात आले होते त्यानुसार आज ते चौकशीसाठी हजर झाले.
गैरहजर राहिल्याबद्दल १५ हजारांचा दंड
मात्र, अनेक दिवसांनी परमबीर आज चौकशीसाठी चांदिवाल आयोगासमोर हजर झाले. त्यामुळे त्याना यापूर्वी समन्स देवूनही गैरहजर राहिल्याबद्दल १५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. ही रक्कम आठवडाभरात मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची हमी देखील त्यांना दिली आहे. मात्र, या प्रकरणी एक मोठा दिलासा देत त्यांच्या विरोधातील जामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यात आला आहे.