मुंबई :
लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरियंटनं जगभर भीतीचं वातावरण निर्माण केलं असताना, भारतातही खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात झालीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनासोबत चर्चा करून, यासंबंधी आवश्यक पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला आदेश दिलेत की, “कोव्हिडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा.”
विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रात निर्बंधांची नवी नियमावली
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं खबरदारी घेण्यास सुरुवात केलीय. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.
परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला केंद्र सरकारनं घालून दिलेल्या नियमांचा पालन करावं लागेल, तर इतर राज्यातून येणारा प्रवासी दोन्ही लशी घेतलेला असावा किंवा 72 तासांपूर्वी RT-PCR चाचणी केलेला असावा, असं महाराष्ट्र सरकारनं नव्या नियमावलीत म्हटलंय.
राज्यात सार्वजनिक वाहतुकीसाठीही लशीच्या दोन्ही डोसची अट ठेवण्यात आलीय. कार्यक्रम, सभागृह, मॉल्स यांमध्ये प्रवेशासही हा नियम लागू करण्यात आलाय.