पुणे :
फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: महापालिकेच्या मैदानात उतरले आहेत.
त्यानुसार पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये नुकताच पदाधिकारी मेळावा घेतला आहे. त्यानंतर आता पुणे महापालिकेसाठी दिवाळीनंतर पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वत: शरद पवार लक्ष घालीत असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत दिवाळीनंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. त्याबाबत पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे. या बैठकीत आजी माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे दिवाळीनंतरची राष्ट्रवादीची ही बैठक महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र, पुण्यासारखी महत्वाची महापालिका काबिज करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
येत्या महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार, असा निर्धार राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात जगताप बोलत होते. सत्ताधारी भाजपच्या कामावरती पुणेकरांमध्ये असंतोष आहे. पुणेकर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवतील. अजित पवारांच्या नेतृत्वात महापालिका जिंकू असा विश्वास शहराध्यक्ष जगताप यांनी व्यक्त केला. पुणे महापालिकेत एकूण 164 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. त्यापैकी भाजपकडे सर्वाधिक 99 नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी 44, काँग्रेस 9 आणि शिवसेनेकडे 9 जागांचं बळ आहे.