नवी दिल्ली :
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी प्रकरणाबाबत केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. विरोधी पक्षांनी आशिष मिश्राला अटक करण्याची मागणी लावून धरली होती.आशिष मिश्राला अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीबाबत आज महत्वाचा निर्णय दिला आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून आशिष मिश्राला अटक केल्यानंतर त्याची 12 तास चौकशी करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या तपास पथक अर्थात एसआयटीने आशिष मिश्राची 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने आशिष मिश्राला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस कोठडीच्या वेळी आशिष मिश्राची वैद्यकीय चाचणी देखील केली जाणार आहे. चौकशीच्या वेळी त्याला कुठल्याही प्रकारची बळजबरी केली जाणार नाही. तसेच चौकशीच्यावेळी आशिष मिश्रांचे वकील देखील उपस्थित राहतील, असं न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, लखीमपूर घटनेवरून विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यामुळे देशातील सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलेलंं दिसून येत आहे.