पुणे :
पुणे महानगरपालिकेची दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा पुण्यातील एक मोठं उद्योगपती स्वतःच्या हेलिपॅड साठी वापरत असल्याचा आरोप पुणे महानगरपालिकेतील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी केला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समिती कार्यालयाबाहेर खेळण्याच्या हेलिकॉप्टर उडवून वसंत मोरे यांनी भूखंडाचे श्रीखंड लाटण्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी एकत्र मिळवून दफनभूमीची जागा एका मोठ्या उद्योगपतीला हेलिपॅड साठी उपलब्ध करून दिल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.
गुलटेकडी येथील टाऊन प्लॅनिंग स्कीम 144 येथील टी पी 125 ही जमीन दफनभूमीसाठी राखीव होती. मात्र त्या ठिकाणी सध्या पूनावाला यांचा हेलिपॅड अस्तित्वात असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. गुलटेकडी येथील टी पी 125 ही जागा द सोशल वेल्फेअर ट्रस्ट ऑफ पूना यांच्या उपयोगात आणण्याकरिता पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समिती मध्ये 7 जुलै 2021 रोजी ठराव पारित करण्यात आला. या ठरावात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नगरसेवकांनी कोणतीही चर्चा न करता, अवघ्या काही मिनिटात ठराव पारित करून ही जागा पूनावाला यांच्या सोशल वेल्फेअर ट्रस्ट ऑफ पूना यांच्या उपयोगात आणण्याकरिता उपलब्ध करून दिली.
एकीकडे शहरात दफनभूमीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसताना देखील, महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पूनावाला यांना दफनभूमीची जागा हेलिपॅड उतरविण्यासाठी उपलब्ध करून दिली. असा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.
सद्यपरिस्थीतीमध्ये पुणे शहरातील हिंदु, ख्रिश्चन व लिंगायत समाजातील नागरिकांच्या भावानांचा आदर करून याठिकाणी असणारे दफनभूमीचे आरक्षण आहे तसे ठेवण्यात यावे. अन्यथा येणा-या मुख्य सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला.