पुणे :
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वडगाव शेरी येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी भाजपला उद्देशून राऊत म्हणाले की, “तुम्ही काय आमची किंमत करत होता
आमची किंमत राज्य आणि देश ठरवेल. आज आमचे मुख्यमंत्री यांच्या नेत्यासोबत जेवत बसले होते. तुम्ही कुठे होतात? गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो मग महाराष्ट्राचा का नाही? जो या राज्याचं नेतृत्व करतो तो देशाचाच नेता असतो, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना मी चंपा म्हणणं बर नाही, आमची मैत्री खूप जुनी आहे. त्यांच्यावर मी सव्वा रुपयाचा दावा लावलाय. या देशाच्या इतिहासातील सर्वांत कमी रुपयांचा दावा असेल. माझी किंमत तुम्हाला मोजताच येणार नाही, कारण मी शिवसैनिक आहे. मला नको तुमचे 100 कोटी रुपये. मला नकोत तुमचे पैसे. सगळे दिलेय बाळासाहेबांनी. पण मी त्यांच्याकडून सव्वा रुपये घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण मी कोणताही खटला हारत नाही.
पुणे पालिकेवर भगवा फडकवा
राऊत म्हणाले, राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर ज्या पुण्यावर बाळासाहेबांच प्रेम होतं, जिथे ते खूप काळ होते, त्या पुण्यावर आपण अजूनही अडखळत काम करत आहोत. पुणे मनपामध्ये शिवसेनेचे 10 नगरसेवक आहेत, पण आत 10 वर थांबायचे नाही. आगामी निवडणुकीत आपल्याकडे असा एक आकडा लावायचा की आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाचा महापौर होता कामा नये. अजित दादा याच जिल्ह्याचे शहराचे पालकमंत्री आहेत, त्यांच्यासोबत शरद पवराांसोबत बोलणी करु, आघाडी झालीच तर उत्तमच नाही तर आपण आहोतच. पण सगळा खेळ खराब होऊन नये म्हणून पुणे मनपावर शिवेसेनेचा भगवा फडकवण्याची वेळ आली आहे.