पुणे :
देशातील महागाई दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्रीगण किंवा आमदार मोदी सरकारला देशातील वाढत्या महागाईवरून धारेवर धरत असतात.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारला वाढत्या इंधनदरांवरून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
देशातील प्रत्येक इंधन पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवरून अजित पवारांनी मोदींना खोचक टोला लगावला आहे. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून उत्तम प्रकारे काम करणारे अनेक पंतप्रधान देशास मिळाल्याचं पाहिलं आहे. पंतप्रधानपदावर सध्या मोदीसाहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा फोटो लावायचा असा नियम मोदींनी केला आहे.
पुढं बोलताना अजित पवार म्हणतात की, त्यामुळं गमतीनं असं म्हणतो की, 100 च्या पुढं गेलं. पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघावं आणि मग ते म्हणतात की बघ कशी जिरवली तुझी, आता घाल 100 रूपयाचे पेट्रोल, असा टोला अजित पवारांनी मोदींना लगावला आहे. अजित पवार मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बारामती मध्ये एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते.
दरम्यान, मोदी सरकारने टॅक्स लावायाचं काम करावं पण राज्याला तो अधिकार दिला गेला आहे. राज्याच्या अधिकारावर गदा आणता कामा नये, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील काही दिवसांपूर्वी घेतली होती.