बाणेर :
इयत्ता दहावी प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्त्वाचे वर्ष आहे. कारण ते पुढील आयुष्याचे यश ठरविते. कोरोना परिस्थितीत ही विद्यांचल हायस्कूल बाणेर च्या विद्यार्थ्यांनी १६ जुलै २०२१ रोजी दहावीच्या निकालात पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. त्यांच्या या कष्टाचे कौतुक म्हणून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ७ सप्टेंबर २०२१ रोजी विद्यांचल
हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
या वर्षी सुद्धा गेल्या १३ वर्षांची परंपरा राखत १०० टक्के निकाल शाळेने मिळवला. त्यात १८ मुलांना विशेष योग्यता श्रेणी मिळाली तर २३ मुलांनी प्रथम श्रेणी मिळवली. १३ मुलांना द्वितीय श्रेणी मिळाली. याच यशासाठी मुलांचा कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष माननीय अशोक मुरकुटे सर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय ज्ञानेश्वर केशवराव तापकीर (अध्यक्ष, योगीराज नागरी पतसंस्था मर्यादित बाणेर) यांनी या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊ सत्कार केला. पहिल्या ५ अव्वल विद्यार्थ्यांना व प्रत्येक विषयात अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना घड्याळ भेट देण्यात आली. योगीराज नागरी पतसंस्था मर्यादित,बाणेर , यांच्यातर्फे ९० % पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या ५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०००/- रुपयाची रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
प्रमुख पाहुणे माननीय ज्ञानेश्वर केशवराव तापकीर, शाळेचे संस्थापक अशोक मुरकुटे, मुख्याध्यापिका मनीषा कुलकर्णी व सर्व शिक्षक वृंद या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले व पुढील समृद्ध वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तापकीर व मुरकुटे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कष्टाचे महत्त्व आणि उच्च शिक्षणासाठी करावी लागणारी वाटचाल कशी करावी याबद्दल सांगितले. या मोलाच्या सल्ल्याचा मुलांना निश्चितच खूप उपयोग होईल.