तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शहरातल्या सर्व खासगी रुग्णालयांना पत्र

0
slider_4552

पुणे :

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी पुढच्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने उपाययोजनाही सुरू करण्यात आल्या आहेत.

पुणे महानगरपालिका कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एकीकडे शहरात आरोग्य व्यवस्थेच्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात असताना आता महापालिकेने शहरातल्या सर्व खासगी रुग्णालयांना पत्र पाठवलं आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कधीही रुग्णालयातले बेड्स ताब्यात घेतले जाऊ शकतात, त्यामुळे तयारीत रहा, अशा सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

’10 टक्के बेड्स लहान मुलांसाठी ठेवा’

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यानही महापालिकेने शहरातले 80 टक्के बेड खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता महापालिकेने 50 टक्के बेड्स कोरोनासाठी राखीव ठेवण्याची तयारी ठेवलीय. यापैकी 10 टक्के बेड्स हे लहान मुलांसाठी ठेवावेत, अशाही सूचनाही महापालिकेने रुग्णालयांना केल्या आहेत.

‘कोरोना रुग्णांना तात्काळ दाखल करून घ्या’

रुग्णांची स्थिती पाहून अनेक रुग्णालय रुग्णांना दाखल करून घेण्यात टाळाटाळ करत असल्याची काही उदाहरणं समोर आली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेत रुग्णालयात येणाऱ्या सर्व कोविड रुग्णांना नकार न देता त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठीही महापालिकेने सूचित केलं आहे. जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांना बेड्स अभावी उपचार मिळण्यास विलंब होणार नाही.

‘बेडच्या उपलब्धतेबाबत डॅशबोर्डवर अद्ययावत माहिती ठेवा’

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वर्तवलेला अंदाज लक्षात घेता आगामी काळात विभागीय आयुक्त पुणे यांनी यापूर्वी उपलब्ध करुन दिलेल्या डॅशबोर्डवर बेड्स उपलब्धतेबाबत माहिती सतत अद्ययावत ठेवण्यात यावी असंही महापालिकेनं पत्रात म्हटलं आहे. तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळतील याबाबत काटेकोर दक्षता घेण्यात यावी आणि रुग्णांवरील उपचार आणि त्यांच्या बिलाच्या आकारणी संदर्भात तक्रारी उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्यावी असं पत्रात सांगण्यात आलं आहे.

एक लाख 80 हजार कोरोनाबाधित आढळण्याची शक्यता

See also  ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव बारगळण्याची शक्यता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात सुमारे सव्वा लाख सक्रिय कोरोनाबाधित होते. तिसऱ्या लाटेत या संख्येच्या दीडपट म्हणजे साधारणपणे एक लाख 80 हजार कोरोनाबाधित आढळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सिजन, खाटा, सिलेंडर यांची उपलब्धता करून देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

‘तर सीओईपी जम्बो कोविड सेंटर सुरू करणार’

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पुण्यात तिसऱ्या लाटेत रुग्णदर कमी ठेवण्याचा प्रयत्न आहे. पण तरीही रुग्णांची संख्या वाढलीच तर सीओईपी इथे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचा विचार केला जाईल असं अतिरित्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितलं आहे.