जुन्नर :
मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, ना मला कधी कुठलीही निवडणूक लढायची आहे, ना मला कोणतीही महत्वाकांक्षा आहे. त्यामूळे जर बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी जर एका राजकीय व्यक्तीची राजकीय आत्महत्या होत असेल, तर याला माझी तयारी आहे. बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार. तसेच बैलगाडा शर्यत बंदी उठवली नाही, तर तुमच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होऊन तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचवणार, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा मालकांना धीर दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मागील १० वर्षांपासून राज्यातील बैलगाडा शर्यती बंद आहेत.
त्यामुळे बैलगाडा मालक चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. यासाठी पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक, चालक, वाजंत्री, बैलगाडा संघटनांचे प्रतिनिधी, आजी माजी आमदार आणि जिल्हा परिषदेचे सदस्य यांची जुन्नर येथे बैठक पार पडली आहे. पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी ही बैठक आयोजित केली होती. यावेळी डॉ. कोल्हे चांगलेच आक्रमक झाले होते.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीत जुन्नरचे आमदार अतुल बेनके, मावळचे आमदार सुनील शेळके, पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्यासह अनेक राजकीय नेते मंडळींसह बैलगाडा मालकांनी आपापली भूमिका मांडली. किमान तात्पुरत्या स्वरूपात बैलगाडे आणि बैलांना सराव करण्याची परवानगी सरकारनं द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. यासाठी सरकारने उच्च न्यायालय आणि प्राणी प्रेमी संघटनांना समज द्यावी, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही बैलगाडा मालकांनी दिला आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी बोलताना सांगितलं की, गेल्या दोन -अडीच वर्षात अनेक कामं केली. पण एक महत्त्वाचं काम बाकी राहिलं आहे, ते म्हणजे बैलगाडा शर्यत सुरू करणं. पण येत्या काळात हेही काम करणार आहे. गेली दोन अडीच वर्षे नेमके काय प्रयत्न केले. हे तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी या बैठकीला हजेरी लावली आहे. लवकरच यावर पंतप्रधान मोदी यांच्याशी बैठक घेणार आहे. सगळ्या बाजू तुमच्यासमोर ठेवल्यानंतर आपण सर्वांनी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. जर मागणी मान्य झाली नाही, तर मी तुमच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात उभा राहील, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं आहे.