पुणे :
मुसळधार पावसाने पुण्यातील भोर तालुक्याच्या कोंढरी गावाजवळ दरड कोसळलीय. त्यामुळे प्रशासनानं संपूर्ण गाव स्थलांतरित केलं. दरड कोसळल्यानं कोंढरी गावातील ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले आहेत. अतिवृष्टीनं भोर महाड रस्त्यावर प्रचंड प्रमाणात भुस्खलन झालंय. 30 ठिकाणी दरड कोसळल्यानं भोर महाड रस्ता संपूर्ण बंद झाला आहे.
कोंढरी गावात मोबाईल नेटवर्क नसल्यानं नागरिकांचा कोणाशीही संपर्क नाही. गावातील 300 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. दरडी कोसळल्यानं रस्त्यावर अक्षरशः दगडांचा खच पडलाय. डोंगरावरून झाडं रस्त्यावर आलीत. त्यामुळे आणखी 5 दिवस रस्ता मोकळा करण्यासाठी लागणार आहे.
सरकार कोंढरी गावचे तळीये-माळीण होण्याची वाट पाहतंय का? : आमदार संग्राम थोपटे
आमदार संग्राम थोपटे यांनी कोंढरीतील परिस्थितीवरुन सरकारवर हल्लाबोल केलाय. शासन कोंढरी गावचं तळीये किंवा माळीण होण्याची वाट पहात आहे का? असा सवाल संग्राम थोपटे उपस्थिती केला.
पुण्यात अतिवृष्टीचा फटका, 12 गावं अंधारात, 7 गावांचा संपर्क तुटला, संपूर्ण कोंढरी गाव स्थलांतरीत
अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यालाही मोठा फटका बसलाय. मुसळधार पावसानंतर भोर तालुक्यातील 12 गावं अंधारात गेलीत, तर 7 गावांचा संपर्क तुटलाय. याशिवाय डोंगराला भेगा पडल्याने शेजारील संपूर्ण कोंढरी गावाचं स्थलांतर केलंय. या गावातील सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
घाटमाथ्यावर सलग पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोंढरी गावात सलग 3 वर्षांपासून भुस्खलन होत आहे. त्यामुळे या वर्षी सुद्धा गावातील 40 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.