पुणे :
शहरातील वाढते प्रदूषण आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने शहरात ई-बाइक सुरू करण्याचा निर्णय महापालिके ने घेतला आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला मुख्य सभेनेही मान्यता दिली आली. प्रयोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात येणार असून योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने एकूण तीन ते पाच हजार ई-बाइक उपलब्ध होणार आहेत. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी शहर सुधारणा समिती अध्यक्ष असताना या योजनेचा पाठपुरावा केला होता.
खासगी कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०० ई-बाइक पुणेकरांना भाडेकराराने उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या करारनाम्यासही मान्यता देण्यात आली असून व्ही-ट्रो मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ईमॅट्रीक्स माइल या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे.
हरित पुणे या संकल्पनेसाठी इलेक्ट्रिक बाइक रेटिंग प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत पुणेकरांना ही सेवा दिली जाणार आहे. प्रति किलोमीटरसाठी कमीत कमी ९० पैसे ते जास्तीत जास्त ४ रुपये या दराने या पर्यावरणपूरक गाडय़ा उपलब्ध होणार आहेत. सायकल योजनेप्रमाणेच ही योजना आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य रस्त्यांवर चार्जिग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. एका चार्जिग स्टेशनमध्ये १० गाडय़ा एकावेळी चार्ज होऊ शकतील. सध्या पाचशे स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात पाचशे गाडय़ा सुरू करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी स्मार्ट सिटी आणि पुणे मेट्रो प्रकल्पाचेही सहकार्य घेतले जाणार आहे. करार केलेल्या कंपनीकडूनच गाडय़ा उपलब्ध करणे, चार्जिग स्टेशन उभारणे अशी कामे केली जाणार आहेत. त्याचा कोणताही आर्थिक भार महापालिके वर पडणार नाही.