भारताचा वरिष्ठ संघ मागील एका महिन्यापासून इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंड दौऱ्यावर सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळल्यानंतर पाहुण्या भारताला इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ४ ऑगस्टपासून डर्हम कसोटी सामन्याने या मालिकेची सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी इंग्लंडमधून मोठी बातमी पुढे येत आहे. इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघातील २ क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याचे समजत आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कसोटी संघातील २ क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील एका क्रिकेटपटूने इंग्लंडमध्ये आपल्या नातेवाईकाच्या घरी स्वत:ला एकांतवासात (सेल्फ क्वारंटाईन) ठेवले आहे.
तर दुसरा क्रिकेटपटू कोरोनाची लागण झाल्यानंतर आता निगेटिव्ह आढळला आहे. तरीही तो रविवारपर्यंत (१८ जुलै) विलगीकरणात राहणार आहे. सुखद बाब म्हणजे, या दोन्ही क्रिकेटपटूंमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्त भारतीय क्रिकेटपटूंपैकी एकाला सुरुवातीला घशात खवखव होऊ लागल्याने त्याने कोरोनाची चाचणी करुन घेतली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे त्याने स्वत:ला एकांतवासात ठेवले आहे. याबरोबरच त्याच्या संपर्कात आलेल्या इतर संघ सहकारी आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनाही ३ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांनी आपला विलगीकरण कालावधी पूर्णही केला आहे.
गुरुवारी (१५ जुलै) २० दिवसांच्या सुट्टीवर गेलेले सर्व भारतीय क्रिकेटपटू डर्हम येथे सराव सामन्यासाठी एकत्र जमणार आहेत. मात्र कोरोना पॉझिटिव्ह क्रिकेटपटूंना त्यांचा विगलीकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे ते सराव सामन्याला मुकणार आहेत. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्यांना संघात स्थान मिळेल की नाही? हे अद्याप अस्पष्ट आहे.
असे असले तरीही, अद्याप त्या क्रिकेटपटूंचे नाव पुढे आलेले नाही. तसेच बीसीसीआयनेही यासंदर्भात कसलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.