राज्याचं नवं इलेक्ट्रिक कार धोरण आदित्य ठाकरे यांनी केले जाहीर

0
slider_4552

मुंबई।

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याचं नवं इलेक्ट्रिक कार धोरण जाहीर केलंय. ‘पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर तसेच त्यामुळे होणारे प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व समस्येवर इलेक्ट्रिक कार हा पर्यावरण पूरक असा पर्याय आहे,’ असं मत यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. याच संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन धोरण जाहीर केलं आहे. दरम्यान, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते १३ जुलै नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले.

ठाकरे म्हणाले, ‘पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर तसेच त्यामुळे होणारे प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व समस्येवर इलेक्ट्रिक कार हा पर्यावरण पूरक असा पर्याय आहे. मात्र हा पर्याय सर्व सामान्य नागरिकांनाही परवडणारा आणि सोपा हवा. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल कारला उत्तम पर्याय आहेत. नागरिक इलेक्ट्रिक कार स्विकारतील. या सर्वांसाठी राज्य सरकारचं नवं धोरण अतिशय महत्वाचं आहे.’

२०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १० टक्के हिस्सा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचा असेल.

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक शहरात २०२५ पर्यंत सार्वजनिक वाहतुकीचे २५ टक्के विद्युतीकरण करणार.

२०२५ पर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि सोलापूर या ७ शहरांमध्ये सार्वजनिक आणि निम सार्वजनिक चार्जिंग सुविधा उभारणार.

मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक, पुणे ते नाशिक आणि मुंबई ते नागपूर या महामार्गांवर चार्जिंग सुविधा उभारणार.

एप्रिल २०२२ पासून मुख्य शहरांतील परीचालित होणारी सर्व नवीन सरकारी वाहनं (मालकी/भाडे तत्वावरील) ही इलेक्ट्रिक वाहने असतील.

सुभाष देसाई म्हणाले, ‘दिवसेंदिवस इंधनाचे दर गगणाला भिडत आहेत. सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडत नाही. याला पर्याय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे शासनाने धोरण ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे. ही गरज मॅजेंडा कंपनी नक्कीच पूर्ण करील.’

See also  अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक सिनेमापूर्वी काळे झेंडे दाखवणार' : नाना पटोले

‘नवी मुंबई येथे देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन’
कंपनीने चार्जिंग स्टेशनसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा व सुटे भाग देखील तयार करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण देशी बनावटीचे हे सुटे भाग असतील. नवी मुंबई येथे सुरू झालेले हे देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन असल्याचा कंपनीने दावा केला आहे. या ठिकाणी एकूण २१ चार्जेर असून यातील चार डीसी चार्जर १५ ते ५०किलोवॅट क्षमतेचे आहेत. १७ एसी चार्जर ३.५ ते ७.५ किलोवॅट क्षमतेचे आहेत. यातील एसी चार्जर पूर्णपणे भारतात तयार केले आहे. हे चार्जर एकत्रित ४० केव्ही सौर उर्जेसह स्थानिक ग्रीडला जोडले आहे.

या ठिकाणी २४ तास सेवा दिली जाणार आहे. त्याचा वापर चार्जग्रीड ॲपद्वारे केला जाऊ शकतो. या केंद्रात दरमहा ४ हजार एसी चार्जर तयार केले जाणार आहेत, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी कंपनीचे कार्यकारी संचालक मॅक्सन लेविस, संचालक डॅरिल डायस, सुजय जैन, महावीर लुनावत आदी उपस्थित होते.