पुणे :
पुणेकरांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फक्त १० रुपयात दिवसभर एसी बस प्रवास योजनेचा लोकार्पण सोहळा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. पुणेकरांचा बसचा प्रवास आता स्वस्त आणि सुलभ होणार असून पुणेकरांना केवळ १० रुपयांमध्ये संपूर्ण दिवस एसी बसमधून प्रवास करता येणार आहे. या एसी बस पूर्णपणे इलेक्ट्रिक बस आहेत. पुण्यात पहिल्या टप्प्यात ५० एसी बस धावणार आहेत. या बसेसमुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. पुण्यातील वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सक्षम करण्याच्या हेतूने पुणे पालिकेकडून पुण्यात ही बससेवा सुरु करण्यात आली आहे.
पुण्यातील प्रवाशांचा आणि वाहतूक सेवांचा विचार करुन एसी बससेवा सुरु केल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी पुणे पालिकेचे अभिनंदन केले. १० रुपयात एसी बस सेवा ही अतिशय कल्पक योजना असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी या योजनेचे कौतुक केले. या लोकार्पण सोहळ्याला देवेंद्र फडणवीसांसोबतच चंद्रकांत पाटील, गिरीश बापट देखील उपस्थित होते.
पुणे पालिकेने देशातील सर्वाधिक इलेक्ट्रिक बसची खरेदी केली आहे. पुण्यातील पेठांमध्ये मिनी बसची सर्वात जास्त गरज होती. अनेक लोक हे सार्वजनिक वाहतूकीचा वापर करुन प्रवास करतात. त्यांच्यासाठी ही सेवा सर्वोत्तम आहे. यामुळे त्याचा वेळ आणि पैसा वाचणार आहे त्याचप्रमाणे शहरात होणाऱ्या प्रदूषण देखील कमी होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
लवकरच डिजिटल अँप लाँच करणार
पुण्यात बससेवा प्रवाशांना सुखकर होण्यासाठी पुणे पालिका लवकरच डिजिटल अँप सुरू करणार आहे. या अँपचे काम होत आल्याची माहिती देण्यात आली आहे. या डिजिलटल अँपमुळे लोकांना आपल्या फोनमधून आपल्या घरा जवळील बसस्टॉप कोणते हे कळू शकणार आहे. अनेक जण बससी वाट पाहत तासंतास बस स्टॉपवर उभे राहतात. मात्र या अँपच्या माध्यमातून लोकांना आपल्याला जाण्यासाठी बस कुठे मिळेल आणि ती कुठे थांबेल हे समजणार आहे. तर गुगलचा वापर करुन आपली बस किती वेळात येणार आहे हे देखील कळणे सोपे होणार आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा उपयोग करणाऱ्या सर्वसमान्य प्रवाशांना याचा सर्वाधिक फायदा होईल.