औंध :
औंध प्रभाग क्रमांक 8 मधील ब्रेमन चौक येथे मुलांची वाहतूक पाठशालाचे उद्घाटन महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाले. तसेच यावेळी उद्घाटनाच्या नामफलकाचे अनावरण आणि वृक्षारोपण हा कार्यक्रम संपन्न झाला. लहान मुलांना वाहतुकीचे नियम समजावे म्हणून पुण्यातील पहिले लहान मुलांसाठी वाहतूक पाठशाळेचे पार्क नगरसेविका अर्चना मुसळे आणि ॲड. मधुकर मुसळे यांच्या प्रयत्नातून साकार झाले.
याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, उपमहापौर सुनिता वाडेकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेविका अर्चना मुसळे, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, ॲड. मधूकर मुसळे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते व महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी मॅक न्यूज शी बोलताना ॲड. मुसळे यांनी सांगितले की, लहान मुलांच्या कोवळ्या मनावरती वाहतुकीच्या नियम पाळण्याचे संस्कार व्हावे व वाहतुकीचे नियम पाळणारी नवीन पिढी तयार व्हावी म्हणून हा प्रकल्प औंध मधील ब्रेमन चौकांमध्ये कार्यान्वित करून घेतला आहे. प्रकल्प उभा करताना येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर करून प्रकल्प सुंदर आणि दर्जेदार कसा होईल याकडे आवर्जून लक्ष दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
औंध येथील ट्राफिक पार्क चे वैशिष्ट्य :
औंध येथील ब्रेमेन चौकात दीड कोटी रुपये खर्च करून दीड एकर जागेवर चिल्ड्रेन्स ट्राफिक पार्क अर्थात वाहतुकीची पाठशाळा उभारण्यात आले आहे. डेन्मार्कमधील कोपनहेगन शहरात अशा प्रकारचे चिल्ड्रन्स पार्क असून त्या धर्तीवर वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण चिल्ड्रन्स पार्क पुणे शहरात महानगरपालिकेकडून औंध येथे तयार केले आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना याठिकाणी मोफत वाहतुकीच्या नियमाचे प्रशिक्षण दिले जाणार असून, खेळत खेळत सायकली चालवत रस्त्यावरील पाळावे लागणारे वाहतुकीचे सर्व नियमांची माहिती, सर्व चिन्हांची माहिती या ठिकाणी दिली जाणार असून वाहतुकीच्या संदर्भातील सर्व अद्यावत माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या ठिकाणी पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, सीसीटीव्ही व्यवस्था सुरक्षारक्षक इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध असून सेफ किड्स या संस्थेस ही वाहतुकीची पाठशाळा चालविण्यासाठी देण्यात आलेली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहली या ठिकाणी आयोजित करून निशुल्कपने सर्व विद्यार्थ्यांना याठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सांगितले.