नरेन्द्र मोदी मंत्रिमंडळात महत्वाचे खाते मिळाल्याने रावसाहेब दानवेनचे वजन वाढले.

0

नवी दिल्ली :

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. या विस्ताराआधी अनेक दिग्गज नेत्यांचे राजीनामे घेण्यात आले. प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन, रविशंकर प्रसाद, संजय धोत्रे या नेत्यांच्या राजीनाम्यांनी सर्वांनाच चकित केले. याचबरोबरच रावसाहेब दानवेंचाही राजीनामा घेण्यात आल्याची चर्चा रंगली होती. याबाबत विविध माध्यमांनी वृत्तही प्रसिद्ध केले होते. परंतु दानवेंनी स्वत: माध्यमांसमोर येऊन स्थिती स्पष्ट केली.

केंद्रात मंत्रिपद भूषविणारे जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. भोकरदन तालुका हा त्यांचा बालेकिल्ला. यापूर्वी त्यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. काल मंत्रिमंडळविस्तारापूर्वी एकापाठोपाठ 12 मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आल्याचं वृत्त जवळपास सर्वच माध्यमांनी दिलं होतं. जावडेकर, धोत्रे, हर्षवर्धन, रविशंकर प्रसाद या नावांबरोबरच दानवेंचं नाव घेण्यात आलं होतं. परंतु शपथविधीच्या ऐन आधी माध्यमांसमोर येत दानवेंनी स्पष्ट केलं की, माझ्याकडून कोणताही राजीनामा मागण्यात आलेला नाही.

काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या चार जणांचा समावेश झाला. नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि डॉ. भागवत कराड या चार जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. दानवेंनी माध्यमांना सांगितलं की, मी कोणताही राजीनामा दिलेला नाही. पक्षाध्यक्षांचा निर्णय सर्वांनाच मान्य करावा लागतो. संजय धोत्रेंचा राजीनामा घेतला त्याचदरम्यान मी दिल्लीसाठी विमानात बसलो. त्यामुळे माध्यमांना वाटलं की, माझाही राजीनामा होऊ शकतो. पण माझा राजीनामा पक्षानं मागितलाही नाही. तसं कुणीही मला सांगितलं नाही. त्यामुळे मोदींचा माझ्यावर विश्वास असल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे!

रावसाहेब दानवेंकडे आता रेल्वे, कोळसा आणि खाण कामगार राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दानवेंकडे हे महत्त्वाचं खातं देण्यात आल्यानं मोदी मंत्रिमंडळात त्यांचं वजन उलट वाढलं आहे.

See also  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण