पुणे :
काही दिवसांपासून पुण्यातील महामारीची परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. याचाच परिणाम म्हणून, सीओईपीच्या मैदानावर उभारण्यात आलेले जम्बो कोव्हिड सेंटर, अखेर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
याआधी १ जूनला रुग्णालयातील ३०० ऑक्सिजन बेड्स कमी करण्यात आले होते. तसेच, पहिली लाट ओसरल्यानंतर, १५ जानेवारीला पहिल्यांदा जम्बो रुग्णालय बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा हे बंद करण्यात आले असून, या लाटेमध्ये २२ मार्चपासून १ जुलैपर्यंत एकूण ३००९ बाधित रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
त्यापैकी १९०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर ६५४ जणांचा मृत्यू झाला आहे. आता गरज पडल्यास पुन्हा हे सेंटर कार्यान्वित केले जाईल,” अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.
दरम्यान, केंद्राच्या आणि राज्याच्या ‘टास्क फोर्स’ने देशात आणि राज्यात महामारीची तिसरी लाट येणायची शक्यता व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने पावले उचलायला सुरुवात केली असून, राज्यात सुरु असलेली लसीकरण मोहीमही वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राज्याच्या लसीकरण मोहीमेबाबत अजून मोठी घोषणा केली असून, “राज्यातील लसीकरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे,” असे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी, “सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड, तिसऱ्या टप्प्यात आणि ग्रामीण भाग चौथ्या टप्प्यात आहे. मात्र, आता ग्रामीण भागातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येतील. तसेच पुण्यातील नागरिकांची लसीकरणाची मोहीम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही, त्यामुळे नियमांत शिथिलता आणली असली, तरी नागरिकांनी गाफील राहू नये आणि नियमांचं पालन करावं,” असे आवाहन त्यांनी केले आहे.