बालेवाडी :
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला कोणताच सण मोठ्या प्रमाणात एकत्रितपणे साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पती पत्नीच्या अतुट बंधनात वटपौर्णिमेच्या सणाला खूप मोठे महत्त्व आपल्या संस्कृतीत आहे. पण कोरोना मुळे आपणाला वटवृक्षापर्यंत जाणे शक्य नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर चे उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर यांच्या माध्यमातून व बालेवाडी वुमेन्स क्लबच्या अध्यक्ष प्रा. रूपाली सागर बालवडकर यांच्या “वडाचे रोप आपल्या दारी” या संकल्पनेतून बालेवाडी येथील सोसायट्यांमध्ये वडाचे रोप वाटप करण्यात आले. त्यामुळे सोसायटीत मर्यादित गर्दीत आणि सुरक्षित वावराचे नियम पाळून पारंपरिक पद्धतीची जोड देऊन सोसायट्या मध्ये हा सण साजरा करता आला.
याची माहिती मॅक न्यूजला देताना बालेवाडी वुमन्स क्लब अध्यक्ष रुपाली सागर बालवडकर यांनी सांगितले की,
भारतीय परंपरेत प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्त्व आहे. या सणांमध्ये कुटुंब आणि नातेसंबंध यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यापैकीच एक म्हणजे, वटपौर्णिमा. या सणाच्या माध्यमातून पती-पत्नीच्या रुपाने कुटुंबातील महत्त्वाच्या नात्याचे धागे मजबूत होतात. त्यामुळेच महिलांना आपल्या सुरक्षिततेची खबरदारी घेऊन वटपौर्णिमा साजरी करता यावी या उद्देशाने आम्ही वडाचे रोप शक्य तितक्या सोसायट्यांना पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून महिलांना गर्दी न करता स्वतःची व कुटुंबाची सुरक्षिततेची काळजी घेऊन वटपौर्णिमा साजरी करता आली याचा आनंद वाटतो असे त्यांनी यावेळी सांगितले.