बाणेर, बालेवाडी-म्हाळुंगे भागातील कोरोनामुळे निराधार पाल्याला एस के पी चा आधार : डॉ. सागर बालवडकर

0
slider_4552

पुणे :

‘कोरोनामुळे घरातील कमावती व्यक्ती गमावल्याने निराधार झालेल्या पाल्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी बाणेर, बालेवाडी-म्हाळुंगे भागातील अशा निराधार पाल्याचे शैक्षणिक पालकत्व बालेवाडीतील श्री खंडेराय प्रतिष्ठान (SKP CAMPUS) स्वीकारणार आहे. या उपक्रमांतर्गत अशा पाल्यांना आमच्या शिक्षणसंस्थेत के जी टू पी जी पर्यंतचे मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी अशा पाल्यांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी एस के पी कॅम्पस येथे संपर्क साधावा,’ असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांनी रविवारी केले.

एस के पी कॅम्पसचा ३३ वा वर्धापनदिन रविवारी साजरा करण्यात आला. करोना परिस्थितीमुळे डॉ. सागर बालवडकर यांनी ऑनलाइन बैठकीत शिक्षकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी संस्थेचा आजपर्यंतचा आढावा घेत संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या नव्या उपक्रमांची घोषणा केली. ‘श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष श्री. गणपतराव (अप्पा) बालवडकर यांनी बालेवाडीतील स्वत:च्या घरी १९८८ मध्ये लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. बालेवाडी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने स्थापन झालेल्या या शिक्षणसंस्थेला रविवारी ३३ वर्षे पूर्ण झाली. संस्थेचे अध्यक्ष अप्पा यांनी घेतलेले अथक परिश्रम, शिक्षकांचे कष्ट आणि विद्यार्थी-पालकांचा विश्वास यामुळे शिक्षणसंस्थेची उत्तुंग वाटचाल झाली. कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसार आणि सामाजिक जाणिवेतून आजपर्यंत संस्थेची वाटचाल झाली असून, यापुढेही ती सुरूच राहणार आहे,’ असा विश्वास बालवडकर यांनी व्यक्त केला.

तसेच, ‘सध्याच्या कोरोनाकाळात अनेकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे घरातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्याने अनेक पाल्य निराधार झाले आहेत. त्यांच्यापुढे आता आपल्या शिक्षणाचे काय होईल, असा प्रश्न आहे. परंतु, या विद्यार्थ्यांची चिंता दूर करण्याचा निर्णय एस के पी शिक्षणसंस्थेने घेतला आहे. त्यातूनच, अशा निराधार पाल्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून के जी टू पी जी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण संस्थेत मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे डॉ. सागर बालवडकर यांनी सांगितले.

See also  बाणेर - बालेवाडी मधील नागरिकांना कोरोना तून सुरक्षित राहण्यासाठी स्टीम वैपरायझर वाटप : भाजपचे प्रकाश बालवडकर यांचा उपक्रम.