भारतीय महिलांच्या जिगरबाज खेळाने ऐतिहासिक कसोटीत इंग्लंड विजयापासून वंचित

0

भारत विरूद्ध इंग्लंड महिला संघांचा एकमेव कसोटी सामना आज संपुष्टात आला. इंग्लंडच्या ब्रिस्टल येथील मैदानावर खेळवला गेलेला हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला. सामन्यात बहुतांश काळ इंग्लंडच्या महिलांनी वर्चस्व गाजवले. मात्र भारताच्या खेळाडूंनी शेवटच्या दिवशी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत इंग्लंडला विजयापासून वंचित ठेवले.

अखेरच्या दिवशी भारताची चिवट झुंज
या सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडच्या ३९६ धावांना उत्तर देतांना भारतीय संघ २३१ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे १६५ धावांची आघाडी मिळालेल्या इंग्लंडने भारताला फॉलो ऑन दिला होता. त्यावेळी फलंदाजी करतांना तिसर्‍या दिवसअखेर भारतीय संघ १ बाद ८३ अशा सुस्थितीत होता.

मात्र सामना वाचवण्यासाठी चौथ्या दिवशी त्यांना शर्थीची झुंज द्यावी लागणार होती.

अंतिम दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा शेफाली वर्माने नेहमीच्या आक्रमक अंदाजात फलंदाजीला सुरुवात केली. मात्र अर्धशतक पूर्ण झाल्यावर ती ६३ धावांवर बाद झाली. त्यानंतर दीप्ती शर्मा आणि पूनम राऊतने ७२ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र दीप्ती शर्मा बाद झाल्यावर भारताची घसरगुंडी उडाली. २ बाद १७१ वरुन भारतीय संघ ७ बाद १९९ अशा नाजूक अवस्थेत सापडला. त्यावेळी इंग्लंड संघ हा सामना सहज खिशात घालेल असे वाटले होते.

मात्र पदार्पणवीर स्नेह राणाने झुंजार खेळी करत हा सामना वाचवला. तिने आधी आठव्या विकेटसाठी शिखा पांडेच्या साथीने ४१ धावांची आणि त्यानंतर नवव्या विकेटसाठी तानिया भाटियाच्या साथीने १०४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. दिवसाची १२ षटके शिल्लक असतांना भारताकडे १७९ धावांची आघाडी होती. पुढे खेळ झाला तरी निकाल शक्य नसल्याने दोन्ही कर्णधारांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. यासह भारतीय संघाने तब्बल सात वर्षांनंतर खेळला गेलेला ऐतिहासिक कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले.

पदार्पणवीर चमकले
या सामन्यात भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या शेफाली वर्मा, स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा यांनी चमकदार कामगिरी केली. शेफालीने पहिल्या डावात ९६ तर दुसर्‍या डावात ६३ धावांची खेळी केली. स्नेह राणाने पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या आणि दुसर्‍या डावात नाबाद ८० धावांची जिगरबाज खेळी साकारली. दीप्ती शर्माने देखील अष्टपैलू योगदान देतांना गोलंदाजीत २ विकेट्स पटकावल्या आणि फलंदाजीत अनुक्रमे नाबाद २९ आणि ५४ धावांची खेळी केली. यातील शेफाली वर्माला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

See also  युरो कप : इंग्लंड चा पराभव करून इटलीचे ५३ वर्षा नंतर विजेतपद