डॉक्टरांना संपूर्ण संरक्षण देण्यासाठी वेळ पडल्यास लोकसभेत खाजगी विधेयक मांडणार : गिरीश बापट

0

पुणे :

डॉक्टरांना संपूर्ण संरक्षण देण्यासाठी वेळ पडल्यास मी लोकसभेत खाजगी विधेयक मांडेन. अशी ग्वाही खासदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी पुण्यातील आंदोलक डॉक्टरांना दिली. इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेच्या वतीने आज संस्थेच्या सभागृहात डॉक्टरांवरील हल्ल्यांचा निषेध करण्यात आला. शहरातील वैद्यकीय व्यावसायिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यावेळी खासदार बापट यांनी आंदोलकांची भेट घेतली.त्यांची भूमिका समजावून घेतली. व संघटनेचे निवेदन बापट यांनी स्विकारले. आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून डॉक्टरांच्या संरक्षणाचा मुद्दा मी लोकसभेत मांडेन असे सांगितले.

आंदोलकांना समोर बोलताना बापट म्हणाले की रुग्णांवर उपचार करताना गुंतागुंत निर्माण झाल्यास नातेवाईकांमध्ये संताप होतो. हे समजण्यासारखे आहे. परंतु त्यावर हिंसा हे उत्तर नाही. डॉक्टरांवर हल्ले करणे हा उपाय नाही. त्यासाठी कठोर कायदा करावा लागेल. मी त्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करेन. असे हल्ले होऊ नयेत यासाठी आपल्याला जनजागृतीही करावी लागेल. मोदी सरकारने आरोग्य या विषयाला सर्वाधिक प्राधान्य दिले असून सद्यस्थितीवर मात करण्यासाठी 84 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे हे सरकार परिस्थितीवर मात करत आहे .कोरोनाच्या बाबतीत आम्ही पैशाचा विचार करीत नाही. पण जीव वाचले पाहिजेत ही आमची भूमिका आहे .

यावेळी आयएम पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब देशमुख, विश्वस्त डॉ. अविनाश भुतकर , कृती समितीचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील डॉ. सुनील इंगळे, डॉ. जयंत नवरंगे यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. गेल्या दीड महिन्यात देशभरात डॉक्टरांवर खूप हल्ले झाले. महाराष्ट्रातही दहा ते पंधरा अशा गंभीर घटना घडल्या. आसाम ,कर्नाटक, दिल्ली व मध्य प्रदेशात अनेक डॉक्टरांवर हल्ले झाले. त्याचा निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयानुसार आज पुण्यात निषेध आंदोलन करण्यात आले. डॉक्टरांवरील हल्ला हा किरकोळ स्वरूपाचा गुन्हा न मानता त्याचा इंडियन पिनल कोडमध्ये समावेश करावा. या मागणीसह प्रत्येक हॉस्पिटल हे संरक्षित झोन जाहीर करावे. हॉस्पिटलच्या सुरक्षा व्यवस्थेचे कठोर नियम तयार करावेत. हल्लेखोरांवरील फटले द्रुतगती न्यायालयात चालवावेत व हल्लेखोरांना कठोर आणि जबर शिक्षा व्हावी. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. अशी माहिती डॉ. संदीप पाटील यांनी दिली. तशा आशयाचे निवेदन बापट यांना देण्यात आले.

See also  महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा सुधारित आराखडा दुरुस्ती सह निवडणूक आयोगाला सादर