लडाख :
एलएसीवर चीनशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारतीय सैन्याला पॅंगाँग-त्सो तलावामध्ये गस्त घालण्यासाठी नवीन नौका मिळण्यास सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सैन्य व आयटीबीपीकडून वापरल्या जाणाऱ्या बोटी आणि स्टीमरपेक्षा या पेट्रोलिंग बोटी जास्त मोठ्या आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एलएसीवर चीनबरोबर सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारताने पांगोंग-त्सो तलावामध्ये गस्तीसाठी 29 नवीन बोटी मागवल्या होत्या. या नवीन नौका भारतातील दोन प्रमुख शीपयार्डमध्ये तयार करण्यात आल्या. गोवा शीपयार्ड लिमिटेडकडून 12 बोटी आणि खासगी शिपयार्डकडून 17 बोटी मागविल्या गेल्या. गोवा शीपयार्ड येथे तयार करण्यात येणाऱ्या वेगवान पेट्रोलिंग नौका मशीन-गन व पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांनी सज्ज आहेत.
खासगी शीपयार्डच्या 35 फूट लांबीच्या बोटी सैनिकांच्या वेगवान हालचालीसाठी वापरण्यात येणार आहे. सुमारे दीड डझन सैनिक या बोटींमध्ये चढू शकतात. आता बातमी अशी आहे की या नव्या बोटींचे वितरण सुरू झाले आहे. पुढील काही महिन्यांत सर्व 29 बोटी सैन्याला प्राप्त होतील.