पुणे :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने पाषाण येथील सोमेश्वर देवस्थान, विठ्ठल सेवा मंडळाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी दिली.
शिवराज्याभिषेक दिन 6 जून रोजी आहे. त्यानिमित्त पाषाण, सोमेश्वरवाडीतील (पेठ जिजापूर) सोमेश्वर मंदिरात रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. याबाबतची अधिक माहिती देताना सनी निम्हण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांनी आजचे सोमेश्वरवाडी, पाषाण हे गाव पेठ जिजापूर म्हणून वसवले होते. इथल्या सोमेश्वर महादेव मंदिरास ते भेट द्यायचे, त्यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थानावर रक्तदानाचे महान कार्य करण्याचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. खऱ्या अर्थाने शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून रक्तदान द्वारे मानवंदना देण्याचे भाग्य प्रत्येक शिवरायांच्या मावळ्यास प्राप्त झाले आहे.
कोरोनाच्या काळात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवला. रक्ताची कमतरता होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. पण, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या लाटेत पुन्हा रक्ताचा तुटवडा जाणवता कामा नये. त्यादृष्टीने आताच रक्ताचा पुरेसा साठा करून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या या पावन भूमीत जन्मलेल्या प्रत्येक माणसामध्ये शिवछत्रपतींच्या मावळ्यांचा वारसा आहे. सगळेच छत्रपतींचे मावळे आहेत आणि स्वराज्यासाठी आणि मराठी माणसाच्या संरक्षणासाठी महाराजांचे मावळे आपले रक्त सांडण्यासाठी कधीही कचरले नाहीत.
आज या कोरोना महामारीच्या रूपाने ती वेळ पुन्हा आली आहे. रुग्णांना रक्ताची गरज आहे आणि मावळे म्हणून आता आपले सर्वांचे कर्तव्य आहे कि या लढाईत रक्त सांडून नव्हे तर रक्तदान करून आपण आपल्या नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी सरसावले पाहिजे.
खऱ्या अर्थाने शिवराज्यभिषेक दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करून सनी निम्हण आणि सहकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या आचार विचार आत्मसात केले आहे. शिवरायांच्या मावळा म्हणवणाऱ्या प्रत्येकाने रक्तदान करुन या शिबिरात सहभाग घेवुन छत्रपतींना अनोखी मानवंदना द्यावी असे आव्हान छत्रपती संभाजी राजे यांनी केले.
सनी निम्हण व सहकाऱ्यांनी हा आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या उपक्रमात सहभागी होवून तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या धमण्यामधून वाहणारे मावळ्यांचे रक्त खऱ्या अर्थाने रक्तदान करुन सार्थकी लागेल त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करावे असे आव्हान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
सळसळत्या रक्ताचा प्रत्येक थेंब गरजूंना उपयोगी यावा, या कोरोनाच्या महामारीत मावळ्यांनी रक्तदान करून महाराजांना मानवंदना द्यावी. रक्तदाता मावळा रक्तदान करून शिवराज्याभिषेक सोहळा अजरामर करेल. कोरोना मुक्तीसाठी जास्तीत जास्त मावळ्यांनी रक्तदान करावे, असे आव्हान माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केले आहे.